नवजा पाऊस चार हजारी; कोयनेत गतवर्षीपेक्षा १० टीएमसी जादा साठा
By नितीन काळेल | Published: August 2, 2023 11:57 AM2023-08-02T11:57:14+5:302023-08-02T11:57:25+5:30
सध्या ७६ टीएमसी पाणी : पाऊस सुरूच; महाबळेश्वरला ९२ मिलीमीटरची नोंद
सातारा : पश्चिम भागात मागीलवर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण अधिक असून नवजाच्या पर्जन्यमानाने चार हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठाही ७६ टीएमसीजवळ पोहोचलाय. त्यामुळे धरणात गतवर्षीपेक्षा १० टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजाला १०९ आणि महाबळेश्वरला ९२ मिलीमीटर झाला आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस सुरू झाला. याला आता एक महिना होऊन गेला आहे. पश्चिम भागातच पावसाचे प्रमाण चांगले राहिले. त्या तुलनेत पूर्वेकडे अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, तापोळा, बामणोली, महाबळेश्वरला यंदा उशिरा पाऊस सुरू होऊनही मागीलवर्षीपेक्षा अधिक पडलेला आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठाही वाढलेला आहे.
बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजाला १०९ मिलीमीटर पडलेला आहे. तर महाबळेश्वरमध्ये ९२ आणि कोयनानगरला ९६ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. एक जूनपासूनचा विचार करता कोयनेला २९२३, नवजा ४१६० आणि महाबळेश्वरला ३८४९ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तर कोयना धरणक्षेत्रातही पाऊस सुरूच आहे. पावसाचा जोर कमी झाला असलातरी पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात २० हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ७५.७७ टीएमसी झालेला. टक्केवारीत हे प्रमाण ७२ झाले आहे. गतवर्षीचा विचार करता कोयना धरणात सुमारे १० टीएमसी पाणीसाठा अधिक आहे. मागीलवर्षी २ आॅगस्ट रोजी धरणात ६५.४३ टीएमसी पाणीसाठा होता. त्याचबरोबर सध्या कोयनेच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धोम धरणाच्या दरवाजातूनही पाणी साेडलेले असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.
नवजाला १३०० मिलीमीटर पाऊस जादा...
पश्चिम भागात पाऊस उशिरा सुरू होऊनही गतवर्षीपेक्षा जादा आहे. कोयनानगर येथे ६४९ मिलीमीटर अधिक पाऊस झालेला आहे. तर महाबळेश्वरला ८३८ आणि नवजा येथे मागीलवर्षीच्या तुलनेत १२८१ मिलीमीटर जादा पर्जन्यमान झालेले आहे.