नवजाच्या पर्जन्यमानाने पार केला पाच हजार मिलीमीटरचा टप्पा, कोयनेतून सांगलीसाठी विसर्ग सुरूच
By नितीन काळेल | Published: August 29, 2023 12:41 PM2023-08-29T12:41:09+5:302023-08-29T12:41:42+5:30
पावसाची प्रतीक्षा कायम, कोयना धरणातील पाणीसाठा ८७ टीएमसीच्या उंबरवठ्यावर
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी असलेतरी नवजाच्या पर्जन्यमानाने यंदा पाच हजार मिलीमीटरचा टप्पा पार केला आहे. तर कोयना धरणातील पाणीसाठा ८७ टीएमसीजवळ पोहोचला असून सांगलीतील सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या उत्तरार्धात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत दोन महिन्यात जवळपास तीन आठवड्याहून अधिक काळ पावसाची दडी राहिलेली आहे. पूर्व भागात तर पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणेही भरलेली नाहीत. तसेच पूर्व भागात पावसाअभावी टॅंकर सुरू आहेत.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ४२ मिलीमीटर पडला आहे. तर कोयना येथे २० आणि महाबळेश्वरला ३२ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ५०३० मिलीमीटर झाली. तसेच कोयनानगर येथे ३५२५ आणि महाबळेश्वरला ४७१२ मिलीमीटर पर्जन्यमान झालेले आहे.
कोयना धरणात ९ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ८६.७८ टीएमसी झाला होता. धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.