नवजा ३२४ तर महाबळेश्वरला २०३ मिलीमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 07:12 PM2020-08-16T19:12:07+5:302020-08-16T19:22:39+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून रविवारी सकाळपर्यंत नवजाला ३२४, महाबळेश्वर २०३ आणि कोयनानगरमध्ये १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
ठळक मुद्देनवजा ३२४ तर महाबळेश्वरला २०३ मिलीमीटर पाऊसकोयनेच्या विसर्गात वाढ : पाणीसाठा ९१ टीएमसीजवळ; दरवाजे ६ फुटांवर
स तारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून रविवारी सकाळपर्यंत नवजाला ३२४, महाबळेश्वर २०३ आणि कोयनानगरमध्ये १८२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सततच्या पावसामुळे कोयना धरणातील साठ्यात वाढ झाली. त्यामुळे सकाळी ११ च्या सुमारास पाणीसाठा ९०.८९ टीएमसी झाला होता. तर विसर्ग वाढवून तो ३५७३२ क्यूसेकवर पोहोचला होता. ६ दरवाजे ६ फुटांपर्यंत उघडण्यात आले होते. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १८२ तर जूनपासून आतापर्यंत ३३१५ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला २०३ आणि आतापर्यंत ३६९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत सर्वाधिक ३२४ आणि आतापर्यंत ३७५९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सकाळी ११ च्या सुमारास कोयना धरणात ५९२६१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर धरणाचे ६ दरवाजे ६ फुटांनी उचलण्यात आले होते. या दरवाजातून ३३६३२ क्यूसेक पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली. परिणामी कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोयना धरणात २४ तासांतजवळपास ५ टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी सातारा शहर व परिसरात पावसाची उघडझाप सुरू होती. सकाळच्या सुमारास पाऊस झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण तयार झाले.