सातारा जिल्ह्यातील नवजाला ७०, महाबळेश्वरला ६३ मिलिमीटर पावसाची नोंद
By नितीन काळेल | Published: July 5, 2024 07:31 PM2024-07-05T19:31:57+5:302024-07-05T19:32:52+5:30
कोयना धरणसाठ्यात एका दिवसात एक टीएमसीने वाढ
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासांत नवजाला ७० तर महाबळेश्वरला ६३ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणक्षेत्रातही पाऊस पडत असल्याने पाणीसाठा २५ टीएमसीवर पोहोचला आहे. धरणसाठ्यात एका दिवसात एक टीएमसीने वाढ झाली आहे.
जुलै महिना सुरू झाल्यापासून पश्चिम भागात पावसाची चांगली हजेरी लागत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली, कांदाटी खोरे परिसरात सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे लोकांना सूर्यदर्शन होईनासे झाले आहे. त्यातच कोयना धरणक्षेत्रातही दमदार पाऊस होत आहे. यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयनानगर येथे ८५ मिलिमीटर झाला आहे. तर १ जूनपासून आतापर्यंत १ हजार २३२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. त्याचबरोबर नवजा येथे यावर्षी आतापर्यंत १ हजार ३४७ आणि महाबळेश्वरमध्ये १ हजार १२९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक टिकून आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात १२ हजार ४७६ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरण पाणीसाठा २५.३९ टीएमसी झाला होता. २४ तासांत धरणात एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. तर मागील १५ दिवसांपासून धरणातील विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. पश्चिम भागातील या पावसामुळे कोयना नदीतील पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
सातारा शहरात ढगाळ वातावरण..
सातारा शहर आणि परिसरात तीन दिवसांपासून पावसाची हुलकावणी आहे. कधीतरी रिमझिम पाऊस होत आहे. नाहीतर सातारकरांना सूर्यदर्शन आणि ढगाळ वातावरणाचे दर्शन घ्यावे लागत आहे. शुक्रवारीही सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले होते.