Navratri 2020 : मी- दुर्गा : अर्चना अहिरेकर यांनी गावापासून कोरोनाला दूर ठेवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 05:51 PM2020-10-26T17:51:24+5:302020-10-26T17:53:50+5:30
coronavirus, navratri, health, sataranews कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणे कधी-कधी अवघड ठरते; पण याच संकट काळात फलटण तालुक्यातील उळुंब येथील अंगणवाडी सेविका अर्चना अहिरेकर यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव अजूनही कोरोनापासून दूर ठेवले आहे. यामध्ये अहिरेकर यांचे योगदान मोलाचे आहे.
नितीन काळेल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणे कधी-कधी अवघड ठरते; पण याच संकट काळात फलटण तालुक्यातील उळुंब येथील अंगणवाडी सेविका अर्चना अहिरेकर यांनी आशा स्वयंसेविका, आरोग्य विभाग आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून गाव अजूनही कोरोनापासून दूर ठेवले आहे. यामध्ये अहिरेकर यांचे योगदान मोलाचे आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. यामध्ये आरोग्य विभागाबरोबरच अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान ठरत आहे. याला कारण म्हणजे सेविकांना सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण याबाबतीत उळुंब येथील अंगणवाडी सेविका व महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक शिक्षिका सेविका संघाच्या जिल्हाध्यक्षा अर्चना अहिरेकर सुदैवी ठरल्या. कारण, त्यांना ग्रामस्थांचे सहकार्य नेहमीच मिळत आले आहे. तसेच कुटुंबही पाठीशी राहिले.
फलटण तालुक्यातील उळुंबची लोकसंख्या १०५२ आहे. या गावात अजूनही कोरोनाने शिरकाव केलेला नाही. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तर गावात मुंबईतून ९५ लोक आले होते. या लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले. प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे त्यांनीही नियमांचे पालन केले.
विशेष म्हणजे अर्चना अहिरेकर यांनी होम क्वारंटाईन झालेल्या काही लोकांना बाजार, भाजीपाला आणि दूध घरी पोहोच केले. अडचणी जाणून घेतल्या; पण गावात कोरोना विषाणू येऊ द्यायचा नाही, यासाठी त्या कार्यरत राहिल्या.
आजही त्या घरोघरी भेट देऊन माहिती घेत असतात.
कोणाला सर्दी, ताप, खोकला आहे का? याची नोंद घेऊन संबंधितांना माहिती दिली जाते. याच कोरोना काळात गावात आरोग्य शिबिर झाले. त्यामधून काही लोकांना मधुमेह, रक्तदाब दिसून आला. सॅनिटायझरचा वापर, मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर याबाबत लोकांमध्ये जनाजागृती करण्यात अर्चना अहिरकेर यशस्वी ठरल्यात. ग्रामस्थांचेही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे उळुंब अजूनही कोरोना विषाणूपासून दूर आहे.
गावातील लोक सुशिक्षित आहेत. आवश्यक तेवढ्या कामासाठीच ग्रामस्थ गावाबाहेर पडत आहेत. तर बाहेरच्या गावांतील लोकांना प्रवेश बंद केला होता. त्यामुळे उळुंब गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. यापुढेही गावात कोरोना येऊ द्यायचा नाही. ग्रामस्थांचा हा निर्धार अजूनही कायम आहे.
- अर्चना अहिरेकर,
अंगणवाडी सेविका
(८८३०२११५७७)