नायगाव व्हावे स्त्रियांचे तीर्थक्षेत्र
By admin | Published: January 3, 2016 10:24 PM2016-01-03T22:24:05+5:302016-01-04T00:50:29+5:30
रामराजे नाईक-निंबाळकर : सावित्रीबाई फुले यांची १८५ वी जयंती साजरी; ग्रंथालयाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
खंडाळा : ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे समाजसुधारक म्हणून केलेले काम आजही प्रेरणादायी आहे. नायगाव येथील सावित्रीबार्इंच्या स्मृती जपण्याचं काम छगन भुजबळ यांनी केले. केवळ जयंतीनिमित्त हा कार्यक्रम न राहता याला व्यापक दृष्टिकोन दिला पाहिजे. सावित्रीबार्इंचे जन्मगाव हे स्त्री सक्षमीकरणाचे तीर्थक्षेत्र व्हावे, त्यासाठी आपण प्रयत्नशील राहू,’ अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.
नायगाव, ता. खंडाळा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची १८५ वी जयंती व भारतीय स्त्रीमुक्ती दिन समारंभामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ होते. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, माजी आमदार कांताताई नलावडे, कमलताई ढोले-पाटील, कृष्णकांत कुदळे, जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, शिक्षण सभापती अमित कदम यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, ‘फुले दाम्पत्यांच्या विचारांची देवाण-घेवाण या ठिकाणाहून झाली पाहिजे. दोन-तीन दिवसांचे वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन होणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र नसले तरी उच्च पदवीधर संशोधन केंद्र या ठिकाणी बनविले पाहिजे. युगपुरुषांच्या विचारावर प्रबोधन तर होईलच; पण त्याचबरोबर शेतकऱ्यांपासून अर्थशास्त्रज्ञांपर्यंत विचारांचे मंथन होईल, यासाठी शासनाकडून मदत झाली पाहिजे.’
पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ‘माझी मुलगी सावित्री व्हावी, ही प्रत्येक पालकाची आस असली पाहिजे. त्यासाठी कौटुंबिक मानसिकता बदलली पाहिजे. नायगावच्या विकास आराखड्यातील प्रलंबित कामे मार्गी लावून निधी उपलब्ध केला जाईल. नायगावला पर्यटनस्थळाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळविण्यासाठी पाठपुरावा करू. शिक्षण क्षेत्रात भरीव काम केले तरच सावित्रीच्या स्मृती जपल्या जातील.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘आजच्या युगात स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुढे आल्या, याचे श्रेय सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे आहे. नायगावमध्ये पाच कोटी रुपये खर्चून अभ्यासिका व पर्यटक निवास उभे राहते आहे, ते काम लवकरच पूर्ण होईल.’ नीरा-देवघरच्या कालव्यांची उर्वरित कामे पूर्ण झाल्यास खंडाळा तालुक्याचा पाण्याचा सर्वच प्रश्न सुटेल, त्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत.
या कार्यक्रमासाठी सभापती रमेश धायगुडे, उपसभापती सारिका माने, जिल्हा परिषद सदस्या स्वाती बरदाडे, आनंदराव शेळके, पंचायत समिती सदस्य नितीनकुमार भरगुडे-पाटील, दीपाली साळुंखे, अनिरुद्ध गाढवे, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, नायगाव सरपंच मनोज नेवसे, उपसरपंच सुजाता नेवसे, तहसीलदार शिवाजी तळपे, गटविकास अधिकारी विलास साबळे, ग्रामपंचायत सदस्य अर्चना देवडे, निखील झगडे, स्वाती जमदाडे, सीमा कांबळे, सुधीर नेवसे आदींसह ग्रामस्थ प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)