सांगली-साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादीही ठाम

By admin | Published: October 23, 2016 12:12 AM2016-10-23T00:12:25+5:302016-10-23T00:40:30+5:30

आघाडीत संघर्ष : दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांची शरद पवारांशी चर्चा, संख्याबळानुसार नेत्यांचा आग्रह

NCP is also in the Sangli-Satara constituency | सांगली-साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादीही ठाम

सांगली-साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादीही ठाम

Next

सांगली : सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या जागेवर काँग्रेसने दावेदारी सुरू केली असली तरी, राष्ट्रवादीचे नेतेही या जागेवर ठाम आहेत. शरद पवारांशी गुरुवारी मुंबईत झालेल्या चर्चेवेळीही सांगली-सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संख्याबळाचा दाखला देत, ही जागा आपल्याकडेच ठेवण्याची जोरदार मागणी केली. त्यामुळे दोन्ही काँग्रेसमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
विधानपरिषदेच्या या जागेवरून दोन्ही काँग्रेसचे नेते आक्रमक बनले आहेत. एका बाजूस पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव कदम यांनी काँग्रेससाठी ही जागा मिळविण्यासाठी जोरदार ताकद लावली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही जिल्ह्यातील दिग्गज नेतेही ही जागा न सोडण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. गुरुवारी शरद पवारांशी झालेल्या चर्चेवेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांगलीतून आ. जयंत पाटील, साताऱ्यामधून रामराजे नाईक-निंबाळकर, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते. दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांनी काँग्रेसच्या एकतर्फी भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. आघाडी करताना ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला होता, हे अधोरेखित करत मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष असल्याने ही जागा ताकदीने लढविण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी २६ आॅक्टोबररोजी पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे.
सांगली आणि सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांची संख्याही काँग्रेसपेक्षा चाळीसने जास्त आहे. सांगली-सातारा विधानपरिषदेच्या जागेवर होणाऱ्या चुरशीच्या निवडणुकांना गतवेळी दोन्ही काँग्रेसमधील तडजोडीमुळे ब्रेक लागला. संख्याबळानुसार ही जागा काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीला दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता असलेले संख्याबळच गृहीत धरले जाणार असल्याने राष्ट्रवादीने संख्याबळाचा दाखला देत ही जागा आपलीच असल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम यांचा उमेदवारी अर्ज २७ रोजी दाखल करणार असल्याचे शनिवारी जाहीर केले. मोहनराव कदमांनीही आता माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे आघाडीत संघर्षाची ठिणगी पडली आहे. ती वेळीच विझवली जाणार की आणखी फुलवली जाणार, याकडे आता दोन्ही पक्षातील इच्छुक व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. अशा स्थितीत विधानपरिषदेच्या जागेवरून आघाडीत बिघाडीची चिन्हे दिसत आहेत. येत्या दोन दिवसात विधानपरिषदेच्या या जागेचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उमेदवारी निश्चितीसाठी पक्षीय पातळीवर हालचाली होणार आहे. (प्रतिनिधी)


हे तर अतिक्रमणच...
आघाडी झाली त्यावेळी संख्याबळाचा विचार करून राष्ट्रवादीला ही जागा सोडण्यात आली होती. आजही संख्याबळाचा विचार केला तर सांगली-सातारा विधानपरिषद मतदारसंघात राष्ट्रवादीच क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यामुळे अचानक काँग्रेसने या जागेवर दावेदारी करून उमेदवारीसाठी अर्ज भरण्याची तयारी करणे म्हणजे राष्ट्रवादीच्या जागेवरील अतिक्रमणच आहे, असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार दिलीपतात्या पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले की, गेल्या चाळीस वर्षांपासून मी सार्वजनिक, राजकीय जीवनात कार्यरत आहे. सहकार क्षेत्रातील अनेक संस्थांचे प्रामाणिकपणे नेतृत्व केले. जिल्हा बँकेचा अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे विधानपरिषदेसाठी मला संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. याबाबत पक्षाचे नेते जयंत पाटील आणि जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे रितसर मागणी केली आहे. याबाबत मी आशावादी आहे.


तर्कवितर्कांना सुरुवात
दोन्ही काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी स्वबळाच्या शक्यतेवरून तर्कवितर्क सुरू केले आहेत. काहींनी राष्ट्रवादीला ही निवडणूक सोपी असल्याचा दावा केला आहे, तर काहींच्या मते भाजप, शिवसेना, अपक्ष व अन्य सदस्यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. काँग्रेसने ताकद लावली तर काहीही घडू शकते.
या मतदारसंघात आघाडी करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला होता. आता याच जागेवरून हे दोन्हीही नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावताना दिसत आहेत. दोन्हीही नेत्यांनी दावेदारी करतानाच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह धरला आहे.

Web Title: NCP is also in the Sangli-Satara constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.