दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार

By नितीन काळेल | Published: December 3, 2023 03:22 PM2023-12-03T15:22:08+5:302023-12-03T15:22:45+5:30

संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी, तरच वस्तूस्थिती समोर येईल,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली.

NCP chief Sharad Pawar has demanded that a caste-wise census be conducted in the entire country | दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार

दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये; मराठा समाजाच्या आरक्षणासाठी दुसरेही पर्याय- शरद पवार

सातारा : दुसऱ्याच्या ताटातील काढून कोणाला देऊ नये ही भूमिका सर्वपक्षीय बैठकीत घेतली आहे. त्यामुळे मराठा समाज आरक्षणासाठी दुसरेही पर्याय आहेत. तसेच संपूर्ण देशात जातनिहाय जनगणना व्हावी, तरच वस्तूस्थिती समोर येईल,’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केली. तसेच जिल्ह्यातील निवडणुकीबाबत त्यांनी उमेदवार देणार आणि निवडूण आणणारच असा इरादाही बोलून दाखविला.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते. शरद पवार हे सातारा दाैऱ्यावर आले होते. जकातवाडी येथील कार्यक्रमाला जाण्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले, ‘देशातील चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचा लागला आहे. यामध्ये वेगळा काही निकाल लागेल अशी माहिती आम्हाला नव्हती. कारण, दोन राज्यात भाजपची सत्ता नव्हती. त्याठिकाणी भाजपने लक्ष केंद्रीत केले होते. तेलंगणात सत्ताधारीच पुन्हा सत्तेत येतील असे एक चित्र दिसून येत होते. पण, राहुल गांधी यांची हैद्राबाद येथे सभा झाली. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तेथील चित्र बदलले.

काॅंग्रेसने चार राज्यातील विधानसभा निवडणुकीबद्दल ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्याचा प्रश्न पत्रकारांनी केल्यावर पवार यांनी मी ईव्हीएम यंत्राला दोष देणार नाही. माझ्याकडे अधिकृत काही माहिती नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे बरोबर नाही. तरीही मंगळवारी काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होत आहे. त्यामध्ये सर्व विषयांवर चर्चा होईल, असे स्पष्ट केले. तसेच मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यावेळी आम्ही दुसऱ्याच्या ताटातील काढून घेऊ नये ही भूमिका घेतलेली. केंद्र शासनानेही याबाबत निर्णय घेण्याचा ठराव घ्यावा, अशी सूचनाही पवार यांनी केली.

अजित पवारांबर अधिक बोलणे टाळले...

शरद पवार यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यामध्ये महायुतीत लोकसभा मतदारसंघ जागा वाटपावर चर्चा झाली असून आघाडीची भूमिका कुठपर्यंत आली आहे, असा प्रश्न केल्यावर पवार यांनी राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र बसून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काैतुक केले असल्याच्या प्रश्नावर त्यांची भाजपशी जवळीक आहे. त्यामुळे ते त्या पक्षाला साजेसेच बोलणार ना ? असे सांगत पवार यांनी अधिक बोलणे टाळले.

पावसात भिजल्यानंतर लोकं काय करतात ते पाहिलंय...

जिल्ह्यातील सातारा लोकसभा मतदारसंघ आणि वाई तसेच फलटण विधानसभा निवडणुकीबाबतचा प्रश्न केल्यावर शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेत पावसात भिजलो. त्यानंतर लोकं काय करतात ते सर्वांनी पाहिलंय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत उमेदवार देणार आणि निवडूण आणणार, असे ठामपणे सांगितले.

Web Title: NCP chief Sharad Pawar has demanded that a caste-wise census be conducted in the entire country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.