रहिमतपूर परिसरातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:47+5:302021-01-19T04:39:47+5:30

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र वाठार किरोली ...

NCP dominates Gram Panchayats in Rahimatpur area! | रहिमतपूर परिसरातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व!

रहिमतपूर परिसरातील ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व!

Next

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले आहे. मात्र वाठार किरोली येथे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनेलने दहा-तीन जागांच्या फरकाने पराभव करत दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली.

रहिमतपूर परिसरातील तारगाव, धामणेर, साप, सायगाव या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने आपले वर्चस्व कायम राखले, तर वाठार व दुर्गळवाडी ग्रामपंचायत काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतली. तारगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कांतिलाल पाटील यांच्या विचाराच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा ९-२ जागांच्या फरकाने पराभव करत ग्रामपंचायतीवरील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. धामणेर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे नेते आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सलग सहाव्यांदा सत्ता मिळवली. नऊपैकी आठ जागा बिनविरोध झाल्या होत्या. मात्र एका जागेसाठी निवडणूक लागली होती. परंतु प्रचंड मतांच्या फरकाने ही जागाही शहाजी क्षीरसागर यांच्या विचारांच्या उमेदवाराने जिंकली.

साप ग्रामपंचायतीसाठी दोन पॅनेलमध्ये अटीतटीची लढत झाली. ८-३ जागांच्या फरकाने दहा वर्षांनंतर सत्तांतर झाले. ही लढत राष्ट्रवादीच्या एका गटाविरोधात महाविकास आघाडी अशी थेट झाली. सायगाव ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी निवडणूक लागली होती. राष्ट्रवादीच्याच दोन गटात झालेल्या लढतीमध्ये मानसिंग घोरपडे यांच्या विचारांच्या पॅनेलने ५-२ जागांच्या फरकाने ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. दुर्गळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सात जागांसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसच्या तुळशीदास यादव यांच्या विचारांच्या पॅनेलने विरोधी पॅनेलचा ५-२ जागांच्या फरकाने पराभव केला.

पंधरा वर्षांची सत्ता उलथवून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतली.

सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेल्या वाठार किरोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जोरदार घमासान झाले. जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांच्या विचाराच्या राष्ट्रीय काँग्रेस पुरस्कृत पॅनेलविरोधात राष्ट्रवादीचे नेते संभाजीराव गायकवाड व भाजपचे युवा नेते विकास गायकवाड यांच्या विचारांच्या पॅनेलमध्ये तेरा जागांसाठी कडवा संघर्ष झाला. भीमराव पाटील यांनी १०-३ जागांच्या फरकाने संभाजीराव गायकवाड यांच्या विचाराच्या पॅनेलचा पराभव करत दहा वर्षांनंतर ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर घडविण्यात यश मिळविले.

Web Title: NCP dominates Gram Panchayats in Rahimatpur area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.