विरोधकांच्या मैदानात राष्ट्रवादीने लावला जोर

By admin | Published: January 10, 2016 10:40 PM2016-01-10T22:40:34+5:302016-01-11T00:48:23+5:30

शरद पवारांकडून पाटणला एक कोटी : रामराजे, घार्गे अन् नरेंद्र पाटलांकडून एकूण पाऊण कोटी; माण-खटाव अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघांत ताकदीने उतरण्याचा निर्णय

NCP has thrown emphasis on opponents' field | विरोधकांच्या मैदानात राष्ट्रवादीने लावला जोर

विरोधकांच्या मैदानात राष्ट्रवादीने लावला जोर

Next

पाटण : ‘सातारा जिल्ह्णात माण-खटाव, दक्षिण कऱ्हाड, पाटण येथे राष्ट्रवादीचे आमदार नाहीत. तेव्हा या ठिकाणी इतर आमदारांनी मदत केली पाहिजे. त्यासाठी मी माझ्या राज्यसभा फंडातून एक कोटी पाटणसाठी देत आहे. सत्यजित पाटणकर यांनी यासाठी कामांची यादी मला द्यावी, मी लगेचच सही करतो. तर ‘रामराजे, प्रभाकर घार्गे आणि नरेंद्र पाटील यांनी तीन ठिकाणी व प्रत्येकी २५ लाख रुपये विकासासाठी द्यावे,’ असे आदेश माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी दिले.
पाटण येथील शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शरद पवार यांनी भाषणाची सुरुवात करताच म्हणाले, ‘मी आज सत्य उघड करतोय, पाटणची जनता खूप सोशीक आहे. येथील जनतेकडे त्याकाळी सत्ता होती. संपूर्ण महाराष्ट्रात लौकिक असणारे नेतृत्त्व होते, मग एवढं सगळं असताना वीज नाही, रस्ते नाहीत, अशी परिस्थिती का? असे समजल्यावर विक्रमसिंह पाटणकरांना पुढे केले. त्यांनी बदल करताना १४७ गावांच्या रस्त्यांना गती दिली. त्यांनी प्रचंड काम केले; पण देखावा केला नाही. आज महाराष्ट्रभर मी बघतोय अनेक कार्यसम्राट आमदार, नगरसेवक म्हणून फलक दिसतात; पण त्यांच्या मतदारसंघात फिरून घरी आल्यावर संध्याकाळी पाठीचे मणके ढिले होतात आणि म्हणे कार्यसम्राट. पाटणकरांनी प्रसिद्धीचे काम केले नाही, त्यांनी पाटणचाच नव्हे राज्याचा विकास केला,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले.अडचणींचा तालुका म्हणून पाटणची राज्यभर ओळख होती. दळणवळण व विजेचा प्रश्न बिकट होता. दुसरीकडे १९५२ ते १९८३ पर्यंत पाटणकडे राज्याची सत्ता होती. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे नेतृत्व म्हणून पाटण तालुक्यातील नेतृत्वाचा महाराष्ट्रात नावलौकिक होता. असे असताना पाटणमधील सुमारे २५० गावे दुर्लक्षित राहिली. २४६ वाड्या-वस्त्यांना वीज नव्हती. कोयना धरणाने राज्याचे भाग्य उजळले; परंतु येथील जनतेचे भाग्य उजळले नाही म्हणून बदल करायचा, असे ठरविले आणि विक्रमसिंह पाटणकर यांना पुढे केले,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार यांनी लोकनेते बाळासाहेब देसार्इंचे नाव न घेता केला.
या कार्यक्रमात विक्रमसिंह पाटणकर यांच्या २६ वर्षांतील ‘विकासाचा सुवर्णकाळ’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. तर चार सहकारी संस्थांच्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. विधान परिषदेचे सभापती रामराजे
नाईक-निंबाळकर, माजी मंत्री जयंत पाटील, सत्यजित पाटणकर यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास आमदार नरेंद्र पाटील, आ. मकरंद पाटील, आ. प्रभाकर घार्गे, सभापती माणिकराव सोनवलकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील आदी उपस्थित होते.
राजाभाऊ शेलार, सुभाष पवार यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)


सकस उत्पादनाचा ब्रँड जर्मनीत पाहिला
शरद पवार म्हणाले, ‘जर्मनीमध्ये गेलो असताना मला तेथील एका कंपनीत पाऊच बघायला मिळाला. तो हातात घेऊन पाहिला तर त्यावर पाटण, जिल्हा सातारा असे नाव होते. तो पाऊच होता सकस दूध उत्पादनाचा. मला ते पाहून धक्का बसला. माझ्या सहकाऱ्यांना मी सांगितले की, पाटणकर मंडळींना साधे समजू नका.’


पहिली निवडणूक पराभवाची
‘सत्यजित पाटणकर यांनी पराभव झाला म्हणून काळजी करू नये. पाटणचा इतिहासच आहे की, पहिली निवडणूक पराभवाने होते. याचा अनुभव विक्रमसिंह पाटणकरांनीसुद्धा घेतलाय; पण पुढील २५ वर्षे ते अपराजित राहिले तसंच तुमच्या बाबतीत होईल.’ असेही शरद पवार यावेळी म्हणाले.


भूमिपूजनाची काळजी नको
माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, ‘आज पाटण शुगर या साखर कारखान्याचे भूमिपूजन होणार की नाही, याची कुजबूज होती. मात्र काळजी करू नका भूमिपूजन होणारच तयारी झाली आहे. काय उत्पादन घ्यायचे ते आम्ही ठरवू विरोधकांनी काळजी करू नये.’

पवनचक्की प्रकल्पाची दूरदृष्टी पाटणकरांचीच
हिंदुस्थानात सर्वात प्रथम ३५ हजार कोटींची गुंतवणूक करून पवनऊर्जा प्रकल्प उभा कोठे असेल तर तो कोयना पठारावर. या मागील दूरदृष्टी होती ती विक्रमसिंह पाटणकर यांची. यामुळेच तालुक्यातील १५०० तरुणांना रोजगार मिळाला, असे पवार म्हणाले. हॉलंड येथील पवनचक्की प्रकल्पाचा अभ्यास करणारी ही मंडळी जगात कुठेही गेल्याशिवाय राहत नाही.

सत्तेत नसतानाही सरकारचे सहकार्य
पाटण : ‘आम्ही सत्तेत असो वा नसो, याच्याशी काही घेणं-देणं नाही. राष्ट्रवादीची सत्ता राज्य किंवा
केंद्रात नाही, याची फिकीर नाही. राष्ट्रवादीची सामान्य माणसांशी बांधिलकी आहे. म्हणूनच सध्याचे राज्य व केंद्र सरकार आम्हाला नेहमीच नाही म्हणत नाही,’ असा विश्वास राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
शरद पवार म्हणाले ‘केंद्रीय कृषिमंत्री असताना कापूस पिकाला ५ हजार ते ५,६०० रुपये पर्यंतचा दर दिला. खान्देशमध्ये कापूस
उत्पादक शेतकऱ्यांना २६०० रुपये मिळतात. केळी उत्पादकांना १० ते ११ रुपये किलो दराने केळी खरेदी करून दिले जात होते. म्हणूनच जळगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात तेथील शेतकऱ्यांनी यापुढे राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहू , अशी भूमिका घेतली होती,’ असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

सरकारवर टीका नाही...
खासदार शरद पवार यांनी काही दिवसांपासून त्यांची राजनीती बदलल्याचे दिसते. पाटणमध्ये भाषण करताना त्यांनी कोणत्याही नेत्यावर किंवा सरकारवर थेट टीका करण्याचे टाळले.

Web Title: NCP has thrown emphasis on opponents' field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.