बाळासाहेब पाटील-अतुल भोसलेंची कराडात राजकीय नांगरट!, कानगोष्टी करीत प्रीतीभोजनही घेतले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 01:39 PM2022-10-14T13:39:32+5:302022-10-14T13:40:22+5:30
बाळासाहेब पाटील आणि अतुल भोसले या दोघांच्या छबीच्या बरोबर मध्यभागी गुलालाची मुठ दिसत होती. त्यामुळे ही गुलालाची मूठ नेमकं काय सांगते? याचीही चर्चा तालुक्याच्या राजकारणात सुरू
प्रमोद सुकरे
कराड : गोळेश्वर (ता. कराड) येथे बुधवारी रात्री एक कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा झाला. यानिमित्ताने गावात बैल जोडी घेऊन नांगरट करत असलेल्या शेतकर्याच्या एका स्टॅच्यूचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी केले. कराड तालुक्याच्या राजकारणात आम्ही दोघे राजकीय नांगरटच करीत असल्याचा संदेश त्यांनी या निमित्ताने दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांच्यात आहे.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकी पासून कराड तालुक्यातील राजकारणाने नवे वळण घेतले आहे. त्याचे प्रत्यंतर वेळोवेळी सर्वांना येत आहेच. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी गोळेश्वर येथे झालेल्या कार्यक्रमाकडे राजकीय मंडळी पाहत आहेत.
गोळेश्रर (ता. कराड) येथील विकास सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर तालुक्यातील दिग्गज्य राजकारण्यांची उपस्थिती होती. यावेळी गावाच्या प्रवेशद्वारावर बैल जोडी घेऊन नांगरट करणाऱ्या शेतकऱ्याचा स्टँच्यू तयार करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन या दोघांच्या हस्ते करण्यात आले.
स्नेह मेळाव्यात बोलताना डॉ. अतुल भोसले यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत पी डी पाटील व जयवंतराव भोसले यांच्या ऋणानुबंधांना उजाळा दिला. तर बाळासाहेब पाटील सहकार मंत्री असताना त्यांनी कृष्णा कारखान्याच्या विस्तारीकरणाच्या मंजुरीसाठी प्रस्तावाला मदत केली असे आवर्जून सांगितले.
बाळासाहेब पाटील यांनी गोळेश्वर गावचा वारसा सांगितला. तर आज आधुनिकरणामुळे बैल जोडीची नागरट पाहायला मिळत नाही. अशावेळी त्याचा स्टॅच्यू बनवून या गावाने वेळा संदेश दिला असल्याचे नमूद केले.
राज्यातील सुरू असणाऱ्या राजकीय घडामोडी, तसेच कराड तालुक्यातील बाजार समितीची नजीकच्या काळात होऊ घातलेली निवडणूक या साऱ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या एकत्रित झालेल्या कार्यक्रमाची चर्चा तर होणारच!
ते भविष्यात बिनविरोधच होतील!
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांनी सभागृहात जाण्याची गरज होती. ती ओळखून आपणही त्यांना मदत केली. पण सध्या बदललेली राजकीय समीकरणे पाहता भविष्यात बाळासाहेब पाटील हे बँकेत बिनविरोधच निवडून जातील असा विश्वास डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
प्रीती भोजनही एकत्र!
पावसामुळे गावात मध्यवर्ती ठिकाणी घेतलेला कार्यक्रम ऐनवेळी एका सभागृहात घेण्यात आला. कार्यक्रम संपल्यानंतर एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानी माजी मंत्री बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांनी कानगोष्टी करीत प्रीतीभोजनही घेतले. आता त्या कानगोष्टी नेमक्या काय झाल्या हे त्या दोघांनाच माहिती.
गुलालाची मूठ नेमकं काय सांगते?
स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने व्यासपीठाच्या पाठीमागच्या बाजूला नेत्यांची छबी असणारा मोठा फ्लेक्स बोर्ड लावण्यात आला होता. बाळासाहेब पाटील आणि अतुल भोसले या दोघांच्या छबीच्या बरोबर मध्यभागी गुलालाची मुठ दिसत होती. त्यामुळे ही गुलालाची मूठ नेमकं काय सांगते? याचीही चर्चा तालुक्याच्या राजकारणात सुरू आहे बरं ..