ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट...; शशिकांत शिंदेंच्या पराभवावर NCP नेत्यानं धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 08:27 PM2021-11-23T20:27:34+5:302021-11-23T20:27:59+5:30
इतकचं नाही तर गुलालाची उधळण करत ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट....या गाण्यावर या नेत्यानं ठेका धरत आनंद व्यक्त केला आहे.
सातारा – गेल्या अनेक दिवसांपासून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकांची रंगत जिल्ह्यात पाहायला मिळत होती. आज या निवडणुकीचा निकाल लागला परंतु धक्कादायक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना अवघ्या १ मताने पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. शशिकांत शिंदे यांच्या पराभवाचा आनंद भाजपा नेत्यांना झाला असेल असं साहजिकच सगळ्यांना वाटेल. परंतु जिल्ह्यात भलतंच राजकारण पाहायला मिळालं आहे.
शशिकांत शिंदे यांच्या पराभवाचा आनंद राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना झाल्याचं दिसून आलं. इतकचं नाही तर गुलालाची उधळण करत ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट....या गाण्यावर या नेत्यानं ठेका धरत आनंद व्यक्त केला आहे. शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर सातारा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी झाल्याचं दिसून येते. याठिकाणी शिंदे समर्थकांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावरच दगडफेक केली. त्याचे व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहेत.
शशिकांत शिंदे यांचा पराभवाचा आनंद साजरा करणारे वसंतराव मानकुमरे हे त्यांच्या ठेक्याने चांगलेच चर्चेत आलेत. वसंतराव मानकुमरे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते आहेत. जिल्हा निवडणूक घोषित झाल्यापासून शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न मानकुमरे यांनी केला. वसंतराव मानकुमरे यांनी विरोधी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना उघड पाठिंबा दिला होता. जावळीतील मतदान प्रतिनिधींना गोव्यापासून केरळपर्यंत फिरवून आणलं होतं.
जावळीत चमत्काराचीच शक्यता...
सातारा आणि जावळी मतदारासंघात मोठी चुरशीची लढत झाली. शशिकांत शिंदे यांनी कोरेगावऐवजी जावळीत लक्ष घातल्याने नाराज झालेल्या अनेकांनी जावळीत त्यांचे गणित चुकविण्याचाच निर्णय घेतला. कधीतरी जुळेल आणि गणित सुटेल यासाठी गेले पंधरा दिवस ठाण मांडून बसलेल्या शशिकांत शिंदे यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यांची मदार रांजणे यांच्यावरच राहिली आणि अखेर सर्व ज्येष्ठ नेत्यांचेही आणि शरद पवारांच्या सूचनेनंतरही रांजणे ऐकलेच नाहीत म्हणे. ज्या पक्षात आहेत असे म्हणतात... त्याच पक्षाच्या नेत्यांचा आदेश धुडकावला. त्यामुळे शशिकांत शिंदेंच्या बाबतीत केवळ चमत्कारच घडू शकतो. मात्र अखेर शशिकांत शिंदे यांचा केवळ १ मताने पराभव झाला.