दिशादर्शक स्तंभ उद्घाटनाने बाळासाहेब पाटील-अतुल भोसलेंची दिशा स्पष्ट!
By प्रमोद सुकरे | Published: November 11, 2022 12:05 PM2022-11-11T12:05:07+5:302022-11-11T12:05:58+5:30
गत १० वर्षांपूर्वी आमदार बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत होता. पण आज 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे!' असेच चित्र पाहायला मिळत आहे.
प्रमोद सुकरे
कराड: राजकारणात कोण कधी काय दिशा दाखवेल अन कोण कधी कोणत्या दिशेला जाईल हे सांगता येत नाही. याचाच प्रत्येय म्हणून वाहगाव (ता. कराड) येथील दिशादर्शक स्तंभ उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाहावे लागेल. राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांनी एका दिशादर्शक स्तंभाचे उद्घाटन केले खरे पण, तालुक्याच्या राजकारणात आम्ही दोघे एकत्रितच आहोत अशी राजकीय 'दिशा'च त्यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना दिल्याचे बोलले जात आहे.कारण समझने वालोंको इशारा काफी होता है ..
वहागाव (ता. कराड) येथे बुधवारी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराकडे जाणारा रस्ता नीट समजावा यासाठी दिवंगत भिकु तुकाराम पवार यांचे स्मरणार्थ शरद पवार यांनी बांधलेल्या दिशादर्शक फलकाचे उद्घाटन बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी दोघांचेही तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. पण दिशादर्शक स्तंभाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने तालुक्यातील आपल्या प्रमुख समर्थकांना या दोघांनी राजकीय दिशाच एक प्रकारे सांगितली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
'दाखवायची दिशा एक आणि जायचं दुसरीकडे' असंही अनेकजण करतात. इथंही मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता नीट समजावा यासाठी बनवलेल्या दिशादर्शक स्तंभाचे उद्घाटन होते. मात्र कार्यकर्त्यांना वेगळीच दिशा दाखवायची होती हे न कळण्याइतके कार्यकर्ते अडाणी राहिलेले नाहीत.
राजकारणात सदा सर्वदा तीच परिस्थिती राहत नसते. कराड तालुक्याच्या राजकीय पटलावरही त्याचा अनुभव आला आहे.राष्ट्रवादी चे नेते, माजी मंत्री बाळासाहेब पाटील व भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या राजकीय वैरत्वाला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत टर्निंग पॉईंट मिळाला. डॉ. भोसले यांच्या मतीने बाळासाहेबांनी जिल्हा बँक निवडणुकीत मैदान मारले. आणि कराड तालुक्याचे राजकारण फिरले. या दोघांच्या तील राजकीय प्रेम आता भलतेच खुलू लागले आहे. आता हे राजकारण पुढे आणखी काय काय वळण घेणार? हे पहावे लागेल.
ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे!
गत १० वर्षांपूर्वी आमदार बाळासाहेब पाटील व डॉ. अतुल भोसले यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत होता. भविष्यात हे दोघे राजकारणात एकत्रित येतील असे त्यावेळी कोणी भाकीत केले असते तर त्याला वेड्यात काढला गेला असता. पण आज 'ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे!' असेच चित्र पाहायला मिळत आहे.
'कही पे निगाहे कही पे निशाना' ..
वहागाव मधील दिशादर्शक स्तंभाचे उद्घाटन तर फक्त निमित्त होते. खरंतर नजीकच्या काळामध्ये होऊ घातलेल्या कराड तालुका शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात हा कार्यक्रम महत्त्वाचा होता.' कही पे निगाहे कही पे निशाना' हे कार्यकर्ते पुरते ओळखून आहेत.