'सहकार'च्या मेळाव्यात शशिकांत शिंदे अन् शिवेंद्रसिंहराजे एकत्र; अजिंक्यतारावर गुजगोष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 10:54 AM2021-11-16T10:54:21+5:302021-11-16T10:58:16+5:30
रांजणेंना थोपविण्याचे प्रयत्न सुरूच
सातारा: सातारा, जावली तालुक्यांत सत्तासंघर्षासाठी झुंज देणारे आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे दोन नेते सोमवारी एकाच व्यासपीठावर आले. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी गुजगोष्टी केल्या. जिल्हा बँकेतील अपक्ष उमेदवार रांजणेंना थोपविण्याचे प्रयत्न सुरूच असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितल्याची माहिती शिंदे यांनी दिली आहे.
अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी सहकार पॅनलचा सातारा व जावळी तालुक्यांचा संयुक्तिक मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, प्रदीप विधाते, पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जावली सोसायटी मतदारसंघामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांना बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींसह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही प्रयत्न केले. रांजणे यांची समजूत काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला; परंतु रांजणे यांनी उमेदवारी मागे घेतली नसल्याने अखेर निवडणूक लागली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने सत्ताधारी पॅनलची जावली सोसायटीतील उमेदवारी आ. शिंदे यांना देण्यात आली असल्याने शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सहकार पॅनलमधील प्रमुख नेत्यांनी प्रचार मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी कारखान्यावर झालेल्या मेळाव्यात शिंदे व शिवेंद्रसिंहराजे या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर गुफ्तगू सुरू होती. व्यासपीठावरच दोघेही एकमेकांशी गप्पा मारत होते. रांजणे यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगितले, अशी माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
१५ सागर-
शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सहकार पॅनलची बैठक झाली. या बैठकीच्या जाहीर व्यासपीठावरच आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात चर्चा झाली. यावेळी आमदार मकरंद पाटील उपस्थित होते.