राष्ट्रवादीने योजना रखडविली
By admin | Published: January 26, 2015 12:41 AM2015-01-26T00:41:45+5:302015-01-26T00:45:59+5:30
जयकुमार गोरेंचा प्रतिटोला : अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी मुक्ताफळे उधळू नयेत
म्हसवड : गेली पंधरा वर्षे कृष्णा खोरेचे अध्यक्षपद आणि मंत्रिपद असूनही राष्ट्रवादीला जिहे-कठापूर योजनेची सुप्रमा मिळविता आली नाही. ज्यांनी जिहे-कठापूर योजना रखडविण्याचे पाप केले, ज्यांना वास्तव माहीत नाही त्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्यांनी मुक्ताफळे उधळू नयेत, असा टोला आमदार जयकुमार गोरे यांनी लगावला.
बोराटवाडी, ता. माण येथे पत्रकारांशी ते बोलत होते. आ. गोरे म्हणाले, ‘जिल्ह्याच्या नूतन पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यापासून जिहे-कठापूर योजनेची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ही योजना आजपर्यंत का झाली नाही याबद्दल काही राजकीय विश्लेषक, स्वत:ला जिहे-कठापूरचे प्रणेते समजणारे, ज्यांना जिहे कुठे आणि कठापूर कुठे हे माहीत नाही, असे अनेक उपद्व्यापी याविषयी मते मांडू लागले आहेत. काही जण योजना पूर्ण करण्याचे आश्वासन देऊ लागले आहेत. पालकमंत्र्यांनी ही योजना दोन वर्षात मार्गी लावू, अशी भूमिका मांडली आहे. अगदी असेच मत गेल्या वर्षी पालकमंत्री झालेल्यांनी व्यक्त केले होते. त्यांनी तर एक वर्षात पाणी आणण्याचा शब्द दिला होता. त्यांची ती भूमिका आततायीपणाचे लक्षण होते, असे आ. गोरे म्हणाले.
खरे पाप रामराजेंचे...
अर्थ खाते अजितदादांकडे आहे. वित्त विभागातून जिहे-कठापूरची फाईल मार्गी लावून आणा. मुख्यमंत्र्यांकडून सुप्रमा घ्यायची जबाबदारी माझी आहे, अशी भूमिका मी त्यांच्याकडे मांडली होती. अनेक वेळा प्रयत्न करूनही अर्थ खात्याकडून योजनेची फाईल मुख्यमंत्र्यांकडे आलीच नव्हती. ही योजना रखडविण्याचे खरे पाप खात्याचा कारभार अध्यक्ष व मंत्री म्हणून पंधरा वर्षे सांभाळणाऱ्या रामराजेंचे आहे, असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला.