राष्ट्रवादीचं मिशन २०२४; माणमध्ये प्रभाकर देशमुख टीकटीक वाजवणार का जयकुमार गोरेंचा चौकार 

By नितीन काळेल | Published: August 28, 2023 01:31 PM2023-08-28T13:31:23+5:302023-08-28T13:32:07+5:30

रणजितसिंह देशमुख तयारीत अन् शेखर गोरे, अनिल देसाई शांत..

NCP Mission 2024 in Man Assembly Constituency, BJP MLA Jayakumar Gore challenged Prabhakar Deshmukh | राष्ट्रवादीचं मिशन २०२४; माणमध्ये प्रभाकर देशमुख टीकटीक वाजवणार का जयकुमार गोरेंचा चौकार 

राष्ट्रवादीचं मिशन २०२४; माणमध्ये प्रभाकर देशमुख टीकटीक वाजवणार का जयकुमार गोरेंचा चौकार 

googlenewsNext

नितीन काळेल 

सातारा : माण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे मिशन २०२४ सुरू असून संवाद मेळाव्यातून त्याची पेरणही केली. यामधून सौम्य वाटणारे प्रभाकर देशमुख यांनी आक्रमक होत घड्याळ्याची टीकटीक वाजविणार असल्याचेच आव्हान दिले आहे. तर भाजपचे आमदार जयकुमार गोरे चौकार ठोकण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये काँग्रेसचे रणजितसिंह देशमुखही उतरले असून बांधणी करत आहेत. तर शिवसेनेचे शेखर गोरे आणि भाजपचे अनिल देसाई शांत असलेतरी मतदारसंघात वादळ उठणार असेच संकेत आहेत.  
 
काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार यांनी १९९९ ला राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी सातारा जिल्हा पाठिशी ठामपणे उभा राहिला. यामध्ये माणही मागे नव्हता. पण, याच माण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा २००९ पासून आमदार नाही ही सल आहे. यातूनच राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठीच शुक्रवारी दहिवडीत कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहित पवार आदी दिग्गज होते. यावेळी उमेदवार म्हणूनच प्रभाकर देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माणदेशाला गुंडगिरी दिल्याचा आरोप जयकुमार गोरेंवर केला. तसेच २०२४ मध्ये झालेली चूक दुरुस्त करु असेही त्यांनी शरद पवार यांच्यासमोर स्पष्ट केले. यावरुनच देशमुख यांची विधानसभेची तयारी झाल्याचे स्पष्ट आहे.

यातून त्यांनी पवारांना आणून राष्ट्रवादीत उत्साह आणण्याचा प्रयत्न केला. तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आमदार गोरेंना जिहे-कठापूरच्या पाण्यावरुन आव्हान दिले. २०२४ च्या निवडणुकीत प्रभाकर देशमुखच निवडूण येतील असे सभेतच जाहीर करुन टाकले. यावरुन पाटील यांनी देशमुख यांना उमेदवारीच जाहीर करुन बळ दिल्याचे स्पष्ट झाले आहे.     

जयकुमार गोरे हे तर २००९ पासून माणचे आमदार आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आमदारांनी कब्जात घेतला. माणचे किंगमेकर समजले जाणारे माजी आमदार दिवंगत सदाशिवराव पोळ यांचा त्यांनी दोनवेळा पराभव केला. तर मागीलवेळी प्रभाकर देशमुख यांना चितपट केले. आता जयकुमार गोरे चौकार ठोकण्याच्या तयारीत आहेत. त्यातूनच मागील महिन्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दहिवडीत मेळावा घेऊन विधानसभेचे रणशिंग फुंकले. हजारोंची गर्दी करुनही त्यातून एकप्रकारे मंत्रीमंडळ विस्तरात दखल घेण्याइतपत ताकदही दाखवली. त्यामुळे विद्यमान आमदार म्हणून गोरे यांचा राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांच्याशीच सरळ सामना होऊ शकतो. कारण, मतदारसंघात राष्ट्रवादीचा दादा गट अजून सक्रिय झालेला नाही.   

रणजितसिंह देशमुख तयारीत अन् शेखर गोरे, अनिल देसाई शांत...

शिवसेनेचे (ठाकरे गट) शेखर गोरे यांनाही आमदार व्हायचे आहे. पण, सध्यातरी त्यांची तयारी  नाही. त्यांनी मागील निवडणूक शिवसेनेतून लढून ३७ हजारांवर मते घेतली होती. भाजप आणि सेनेची युती असतानाही शेखर गोरे रिंगणात होते. आता नसलातरी शेवटच्या टप्प्यात त्यांचा मनसुबा निवडणूक लढविण्याचा असू शकतो. कारण ते पाठिंबा द्यायची शक्यता कमीच आहे. त्यातच त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत रासपकडून दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे ५२ हजार मते मिळवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे सदाशविराव पोळ तिसऱ्या क्रमांकावर गेले होते.

काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख तयारीत आहेत. सहकाराच्या माध्यामातून मतदारसंघात जाळे तयार केले आहे. याचाच फायदा ते घेऊ शकतात. यातूनच त्यांचा कार्यक्रम, आंदोलनाच्या माध्यामातून पक्षाला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न आहे. देशमुख यांनीही २०१४ मध्ये शिवसेनेतून निवडणूक लढवून ३१ हजार मते घेतली होती. जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई भाजपमध्ये आहेत. त्यांचाही स्वत:चा गट आहे. २०१४ ची निवडणूक अपक्ष लढवून त्यांनी १८ हजारांवर मते मिळवली. सध्या त्यांची भूमिका शांततेची दिसून येत आहे. 

Web Title: NCP Mission 2024 in Man Assembly Constituency, BJP MLA Jayakumar Gore challenged Prabhakar Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.