राष्ट्रवादीच्या आमदारांचे विधानसभेत तोंड बंदच...
By admin | Published: January 19, 2017 11:26 PM2017-01-19T23:26:31+5:302017-01-19T23:26:31+5:30
विजय शिवतारे : जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी स्वबळाची तयारी
सातारा : ‘सरकारच्या विरोधात तोंड उघडलं तर आपण ‘आत’ जाऊ, या भीतीने राष्ट्रवादीचे आमदार विधानसभेत तोंड उघडत नाहीत,’ असा आरोप पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी व काँगे्रस सातारा जिल्ह्यात वर्षानुवर्षे सत्ता गाजवित असताना जिल्ह्याला काही मिळाले नाही, ही सत्ता शिवसेना संपुष्टात आणेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेनेने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी स्वबळाची तयारी केली असल्याचे स्पष्ट करून पालकमंत्री म्हणाले, ‘नोटाबंदीमुळे दुधाचे भाव ढासळले, शेती मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल असताना सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी व काँगे्रसचे आमदार गप्प बसतात. नोटाबंदीचे तर सुरुवातीला त्यांनी समर्थनच केले. दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या योजना अडवून ठेवल्या. याउलट शासनात असूनही मी तसेच आमदार शंभूराज देसाई विधानसभेत भाजप मंत्र्यांना धारेवर धरतो. सातारा जिल्ह्यातील लोकांना गंडवून राष्ट्रवादी येथे सत्ता मिळविते. आता ते चालणार नाही. आम्हीच त्यांना घरचा रस्ता दाखवू. जिल्ह्याच्या राजकारणात केवळ हा राजा तर कधी तो राजा, यापलीकडे विकासाच्या मुद्द्यावर कोणी बोलायला तयार नाही.’
पालकमंत्र्यांचा जिल्ह्यात संपर्कच कमी आहे, या परिस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीला कसे सामोरे जाणार? या प्रश्नावर पालकमंत्री म्हणाले, ‘माझा थेट संपर्क नसला तरी मी प्रशासनाच्या संपर्कात असतो. अनेक बाबी माध्यमांपुढे आल्या नसल्या तरी मी कायमच बारीकसारीक घटनांवर लक्ष देऊन असतो,’ असे स्पष्ट केले.
उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ‘शिवसेनेचे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांवर अन्याय होऊ न देता, ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे, त्यांना उमेदवारी दिली जाणार आहे. या निवडणुकीत शिवसेना ताकदीने सामोरी जाईल.’
अनंत तरे यांनीही पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. नोटाबंदीचा फटका सर्वसामान्यांना बसला असून, ४० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. शंभूराज देसाई, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, रणजितसिंह देशमुख, हरिदास जगदाळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांना बळ देण्याची घोषणा...
‘शिवसेना कायमच कुठल्याही निवडणुकीत आरंभशूरपणा करते. मात्र, नंतरच्या काळात कार्यकर्त्यांना बळ दिले जात नाही, याही निवडणुकीत तसेच चित्र दिसेल का? या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी अजिबात नाही, या निवडणुकीची ‘प्रॉपर’ तयारी शिवसेनेने केली असून, कार्यकर्त्यांनाही बळ दिले जाणार आहे,’ असे शिवतारे यांनी स्पष्ट केले.