कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचीच सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:40 AM2021-01-19T04:40:05+5:302021-01-19T04:40:05+5:30

कोरेगाव : विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल सव्वा वर्षानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोरेगाव तालुका अक्षरश: ढवळून निघाला होता. राज्यात सत्तेवर असलेली ...

NCP is in power in Koregaon taluka | कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचीच सत्ता

कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादीचीच सत्ता

googlenewsNext

कोरेगाव : विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल सव्वा वर्षानंतर झालेल्या

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे कोरेगाव तालुका अक्षरश: ढवळून निघाला होता.

राज्यात सत्तेवर असलेली महाविकास आघाडी मात्र या तालुक्यात दिसून आली नाही. आमदार महेश शिंदे विरुद्ध आमदार शशिकांत शिंदे अशीच लढत यावेळी पहावयास मिळाली. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने यश मिळवले आहे. मोठमोठ्या ग्रामपंचायतीवर आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आली आहे. वाठार (किरोली)मध्ये मात्र सत्तांतर झाले असून, कॉंग्रेसच्या विचारांची सत्ता ग्रामपंचायतीत आली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर सव्वा वर्षानी ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्याने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. ज्याप्रमाणे त्या निवडणुकीत मतदान झाले, अगदी त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान झाल्याचे प्रकर्षाने दिसून येत आहे. बहुतांश ठिकाणी विशेषत: मोठ्या गावांमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. सलगच्या सत्तेला ग्रामस्थ कंटाळले असल्याचे मतपेटीतून दिसून आले आहे. कोरेगाव तालुका हा सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघात, तर कोरेगाव, कऱ्हाड उत्तर आणि फलटण राखीव या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये मोडतो. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ज्या- त्या मतदारसंघातील गावांमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधी निर्णय घेतात. ग्रामपंचायत निवडणुकीत देखील हीच प्रथा कायम ठेवण्यात आली. कऱ्हाक उत्तरमध्ये पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने यश मिळवले आहे. फलटण राखीव मतदारसंघात देखील राष्ट्रवादीने यश संपादन केले असून, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण व मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर-पाटील यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीत यश मिळविले आहे. कऱ्हाड उत्तर मतदारसंघात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस अशीच लढत पहावयास मिळाली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेसने निवडणूक लढवली होती, तर काँग्रेसच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी आव्हान दिले होते. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली संभाजीराव गायकवाड गटाची वाठार (किरोली) ग्रामपंचायतीत दहा वर्षे सत्ता होती.

काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी त्याला आव्हान दिले होते. यावेळेस निवडणूक रंगतदार झाली. त्यामध्ये भीमराव पाटील यांच्या गटाने दहा जागा मिळवत सत्तांतर केले. राष्ट्रवादीच्या पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी नागेवाडी, चिलेवाडी, तडवळे संमत, वाघोली, कोलवडी, होलेवाडी, भिवडी व बोधेवाडी (चिमणगाव) या ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली असून, गावपातळीवर एकत्र बसून पक्षविरहित निवडणूक झाल्याचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगितले. एकूणच नजीकच्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची ही नांदी असून, सर्वच पक्षांनी आता निवडणुकीसाठी कंबर कसली असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: NCP is in power in Koregaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.