राष्ट्रवादीच्या रॅलीत साडेआठ लाखांचा डल्ला, चोरट्यांनी केले हात साफ, अनेकांचे खिसे रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 09:29 PM2019-04-02T21:29:16+5:302019-04-02T21:29:42+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती.

NCP rallies loot, steal hands, steal many pockets | राष्ट्रवादीच्या रॅलीत साडेआठ लाखांचा डल्ला, चोरट्यांनी केले हात साफ, अनेकांचे खिसे रिकामे

राष्ट्रवादीच्या रॅलीत साडेआठ लाखांचा डल्ला, चोरट्यांनी केले हात साफ, अनेकांचे खिसे रिकामे

googlenewsNext

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यात आली होती. जमलेल्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी ३३ तोळे सोने व २० हजार रुपयांची रोकड असा एकूण ८ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालावर डल्ला मारला. चोरट्यांनी हात साफ केल्याने अनेक कार्यकर्त्यांचे खिसेच रिकामे झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मकरंद पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह जिल्ह्यातून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने गांधी मैदानात जमले होते. उदयनराजेंची राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढली होती. यासाठी सातारा शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मात्र, उदयनराजे भोसले यांच्या चाहत्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन साताऱ्यात मोठ्या प्रमाणात चोरट्यांनी फिल्डिंग लावली होती. रॅलीत जमलेल्या गर्दीत चोरट्यांनी अनेकांना धक्का देत गळ्यातील सोन्याची चेन व खिशातील रोकड चोरून हात साफ केले. गर्दीमध्ये चेन व पॉकेट खाली पडले असावे, म्हणून कार्यकर्त्यांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, अनेकजण अशाप्रकारे शोधाशोध करत असल्याचे पाहून चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर अनेकांनी रॅली अर्धवट सोडून थेट पोलीस ठाणे गाठले. मात्र, ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तात असल्याने तक्रार घ्यायची कोणी? असा प्रश्न निर्माण झाला होता.

दुपारपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत अनेकांनी ठाण्यासमोर गर्दी केली होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडून तक्रारी घेण्यात आल्या. शाहूपुरी पोलीस ठाण्यात प्रवीण उत्तम कांबळे यांनी तक्रार दिली. यामध्ये गांधी मैदान ते सिटी पोस्ट आॅफिसदरम्यान चोरट्यांनी सात तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावली. त्यांच्याप्रमाणे प्रमोद कांबळे यांची तीन तोळे, योगेश हणमंत गुरव यांची दोन तोळे, संतोष देवरे यांची दोन तोळे, आनंद निकम यांचे एक तोळे, अजय चव्हाण यांची दोन तोळे, संदीप बाबर यांची सहा तोळे, सुरेश दगडू शिर्के (रा. किकली, ता. वाई) यांच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोकड, माजी नगराध्यक्ष प्रकाश कोंडिराम गवळी (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोनेची चेन चोरून नेली. असा एकूण २६ तोळे सोने व ७ हजार रुपये रोकड मिळून ६ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

तर सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कमानी हौद ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान अजय यशंवत भोसले यांचे तीन तोळे, अशोक रामचंद्र पवार यांची दोन तोळे, बिभिषण लक्ष्मण कांबळे यांची १३ हजार रुपये रोख, गणेश सतीश नलवडे यांची १८ ग्रॅम सोन्याची चेन असा नऊ तोळे सोने व १३ हजार रुपयांची रोकड मिळून १ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकूण १३ जणांनी तक्रारी दिल्या. त्यानुसार सुमारे ८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. या घटनेची पोलीस प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून, रॅली मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.

Web Title: NCP rallies loot, steal hands, steal many pockets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.