४५ ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:39 AM2021-01-19T04:39:58+5:302021-01-19T04:39:58+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यातल्या पन्नास ग्रामपंचायतींच्या सोमवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीने तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले. काँग्रेसने तीन ग्रामपंचायतींवर ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यातल्या पन्नास ग्रामपंचायतींच्या सोमवारी झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीने तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये निर्विवाद वर्चस्व राखले. काँग्रेसने तीन ग्रामपंचायतींवर तर भाजपने व शिवसेना यांनी प्रत्येकी एक ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व राखले आहे. तालुक्यामध्ये जवळपास ४५ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे.
बिनविरोध झालेल्या सात ग्रामपंचायतीही राष्ट्रवादीने राखल्या आहेत. यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने लढल्याचे पाहण्यात आले. राष्ट्रवादीने तालुक्यातील बावडा, सुखेड, पाडेगाव, पिंपरे बुद्रुक, बावकलवाडी, बाळूपाटलाचीवाडी, खेड बुद्रुक, अंदोरी, कोपर्डे, पिसाळवाडी, तोंडल, शेखमिरेवाडी, शेडगेवाडी, भाटघर, मिरजे, झगलवाडी, अंबारवाडी, भोळी, राजेवाडी, वाघोशी, कवठे, कण्हेरी, शिंदेवाडी, म्हावशी, कर्नवडी, वडगाव, लोहोम, धावडवाडी, केसुर्डी, मोर्वे, अजनुज, घाटदरे या ठिकाणी राष्ट्रवादीने वर्चस्व राखले आहे.
नायगाव सांगवी, पारगाव, लोणी, भादे या ठिकाणी सर्वपक्षीय असणाऱ्या आघाडीने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. राष्ट्रवादीने झगलवाडी, वाघोशी, शेखमिरेवाडी व बाळुपाटलाचीवाडी येथील सर्वच जागा पटकावल्या आहेत. येथे विरोधकाला शून्यावर समाधान मानावे लागले. बावडा येथे राष्ट्रवादीविरुद्ध व काँग्रेस, शिवसेना गटात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. यामध्ये राष्ट्रवादीला सहा तर काँग्रेसला पाच जागांवर समाधान मानावे लागले. तसेच अहिरे येथे राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्यात जोरदार लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या तर काँग्रेसला चार जागा मिळाल्या. अंदोरी, वाघोशी, भादे, पिंपरे बुद्रुक, घाटदरे, जवळे, शिवाजीनगर व कोपर्डे येथे सत्तांतर झाले. विजयी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समिती आवाराबाहेर आपला विजय साजरा केला.
चिठ्ठीवर नशीब अजमावले
कोपर्डे येथे भानुदास ठोंबरे व अभिजित शिंदे यांना समसमान ३१५ मते पडल्याने चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये भानुदास ठोंबरे विजयी झाले.
शिंदेवाडी येथे वैशाली हिंमत सोनावणे व अनिता रामदास जाधव यांना समसमान १९७ मते पडली. येथे चिठ्ठीवर अनिता जाधव विजयी ठरल्या. वडगाव येथे रूपाली खामकर व दीपाली पवार यांना ७१ अशी समसमान मते पडल्यानंतर चिठ्ठीवर दीपाली पवार विजयी ठरल्या.
धनगरवाडी येथे दोन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत परस्पर विरोधी दोन्ही उमेदवारांपेक्षा नोटाला अधिक मतदान झाल्याने येथील निकाल राखून ठेवण्यात आला आहे.
फोटो १८अंदोरी
अंदोरी येथे सत्तांतरानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.