राष्ट्रवादी ‘सह्याद्री’वर तर काँगे्रस ‘भवन’मध्ये!
By admin | Published: July 22, 2016 11:27 PM2016-07-22T23:27:00+5:302016-07-23T00:10:02+5:30
आज ठरणार धोरण : अविश्वास ठरावाच्या निमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगण्याची चिन्ह
सातारा : जिल्हा परिषदेचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांना पदावरून हटविण्यासाठी राष्ट्रवादीने अविश्वास ठरावाचा सापळा रचला आहे. राष्ट्रवादीमधील या वादळी वातावरणाचा फायदा घेऊन काँगे्रस राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी (दि. २३) राष्ट्रवादीची सह्याद्री साखर कारखान्याच्या विश्रामगृहावर तर काँगे्रसची कमिटी कार्यालयात बैठक होणार आहे.
उपजिल्हाधिकारी तथा साताऱ्याचे प्रभारी प्रांताधिकारी अमृत नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावाच्या अनुषंगाने शनिवारी (दि. ३० जुलै) जिल्हा परिषदेची विशेष सभा आयोजित केली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वतीने आपल्या पक्षाच्या सर्व जिल्हा परिषद सदस्यांना ‘व्हीप’ (पक्षादेश) बजावला आहे. ठरावाच्या बाजूने कमीत कमी ४४ मतांची गरज असल्याने ऐनवेळी आपली मते फुटू नयेत, यासाठी राष्ट्रवादीने हे सावध धोरण राबविले आहे. जिल्हा परिषदेतील ६६ सदस्यांपैकी ३७ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. या सर्व सदस्यांना राष्ट्रवादीने व्हीप बजावली आहे. काँगे्रसच्या चिन्हावर निवडून आलेले; मात्र त्यानंतर राष्ट्रवादीत दाखल झालेले सदस्यही आपल्याला पाठिंबा देतील, असा राष्ट्रवादीचा कयास आहे.
साहजिकच ४४ चा जादुई आकडा गाठण्यासाठी राष्ट्रवादीने काँगे्रस व अपक्षांचीही मने आपल्या बाजूला वळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीने शनिवारी सह्याद्री कारखान्याच्या विश्रामगृहावर बैठक आयोजित केली आहे. या बैठकीचे जिल्हा परिषद सदस्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. चौथ्या शनिवारच्या सुटीमुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज बंद राहणार असल्याने विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व आमदार या बैठकीला उपस्थित राहणार आहे. खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचीही या बैठकीला उपस्थिती असल्याने बरीच चर्चा झडण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या या हालचाली सुरू असतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी जिल्हा काँगे्रस कमिटीत बैठक घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याची आयती संधी काँगे्रसला मिळालेली आहे. मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँगे्रस हे दोनच मोठे प्रतिस्पर्धी सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. जिरवा-जिरवीच्या राजकारणातून राष्ट्रवादीतील अस्वस्थतेचा फायदा काँगे्रस घेण्याची शक्यता आहे.
काँगे्रसजणांना बाबांच्या आदेशाची प्रतीक्षा
जिल्हा काँगे्रस कमिटीमध्ये शनिवारी होणाऱ्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने काँगे्रस आडाखे बांधण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण काय आदेश देतात, याची प्रतीक्षा आता काँगे्रसजणांना लागून राहिली आहे.
अविश्वासाची कोंडी
पक्षाच्या शिवाजीराव शिंदे यांच्यावर अविश्वासाची खेळी करून राष्ट्रवादीने संकट तर ओढावून घेतले नाही ना? अशी चर्चाही सध्या सुरू आहे. राष्ट्रवादीचे हे मोठे धाडस असल्याच्या गप्पाही राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या ठरावाच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे राजकीय सत्त्व पणाला लागलेय, हे मात्र नक्की!
कोणीही डोईजड नको...
पक्षाच्या नेत्यांपेक्षा कोणी डोईजड झाला तर ते परवडणारे नसल्याने पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधीत्व करणाऱ्या प्रत्येक सदस्याला पक्ष शिस्तीची जरब बसली पाहिजे, हाच अविश्वास ठराव आणण्यामागे राष्ट्रवादीचा उद्देश आहे.
बैठकीसाठी बोलावणे...
काँगे्रसच्या सदस्यांनीही सह्याद्री विश्रामगृहावर बैठकीला उपस्थित राहावे, यासाठी राष्ट्रवादीतील काही बिनीचे शिलेदार प्रयत्न करत आहेत. आता त्यांच्या विनवण्यांना काँगे्रसचे मंडळी दाद देतात का?, ही बाब अनुत्तरित आहे.