राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून २९ जणांची विधानसभेसाठी दंड थोपटण्याची तयारी; फलटणमधून तब्बल १३ इच्छुक
By नितीन काळेल | Updated: September 19, 2024 22:08 IST2024-09-19T22:07:29+5:302024-09-19T22:08:27+5:30
कऱ्हाड दक्षिणला फाटा; कऱ्हाड उत्तर, कोरेगाव अन् पाटणमधून एकजणच...

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून २९ जणांची विधानसभेसाठी दंड थोपटण्याची तयारी; फलटणमधून तब्बल १३ इच्छुक
सातारा : विधानसभेची निवडणूक काही दिवसांवर आली असून राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा जिल्ह्यात लढण्यासाठी तब्बल २९ जण पुढे आले आहेत. यामध्ये फलटण मतदारसंघातून सर्वाधिक १३ इच्छुक आहेत. तर कऱ्हाड उत्तर, कोरेगाव आणि पाटणमधून एकाचेच नाव समोर आले आहे. पण, कऱ्हाड दक्षिणमधून कोणीही इच्छुक नसल्याचे स्पष्ट झालेले आहे.
विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर महिन्यात होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने सातारा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्यांची नावे मागविण्यात आली होती. त्यानुसार २९ जणांनी विविध मतदारसंघासाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यात विधानसभेचे एेकूण आठ मतदारसंघ आहेत. त्यातील ७ मतदारसंघासाठीचे इच्छुक समोर आले आहेत.
फलटण या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून राजेंद्र भाऊ पाटोळे, अभय धोंडिराम वाघमारे, लक्ष्मण बापूराव माने, अमोल गुलाब आवळे, दिगंबर आगवणे, वैभव शंकर पवार, रमेश तुकाराम आढाव, बुवासाहेब पंडीत हुंबरे, डाॅ. राजेंद्र विष्णू काकडे, प्रा. डाॅ. बाळासाहेब शंकरराव कांबळे, प्रा. डाॅ. अनिल जगताप, घनश्याम राजाराम सरगर, बापूसाहेब तुकाराम जगताप हे इच्छुक आहेत. वाई मतदारसंघात दत्तात्रय सर्जेराव ढमाळ, अनिल बुवासाहेब जगताप, डाॅ. नितीन सावंत, रमेश नारायण धायगुडे-पाटील, कैलास सदाशिव जमदाडे, यशराज मोहन भोसले, नीलेश लक्ष्मण डेरे यांनी उमेदवारीसाठी तयारी दर्शविली आहे.
कोरेगाव मतदारसंघात विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे पुन्हा इच्छुक आहेत. त्यांनीच एकमेव मागणी केलेली आहे. माण मतदारसंघातून प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बॅंक उपाध्यक्ष अनिल देसाई आणि अभयसिंह जगताप यांनी मागणी केली आहे. कऱ्हाड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील तर पाटणमधून सत्यजितसिंह पाटणकर इच्छुक आहेत. तर सातारा-जावळीतून दीपक पवार आणि शफीक शेख यांनी उमेदवारीची मागणी केलेली आहे.