राष्ट्रवादी समर्थकांची चक्क भाजपसोबत आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 12:37 PM2021-01-14T12:37:04+5:302021-01-14T12:38:58+5:30
Grampanchyat Election Satara- तारळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाची सत्ता मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी म्हणजेच पाटणकर गट आणि भाजप एकत्र आले असल्याचे चित्र दिसत आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक होत असून तारळे ग्रामपंचायतीत सत्तांतर होणार की जैसे थे स्थिती राहणार, हे काही दिवसातच स्पष्ट होईल.
अरुण पवार
पाटण : तारळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाची सत्ता मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी म्हणजेच पाटणकर गट आणि भाजप एकत्र आले असल्याचे चित्र दिसत आहे. एकूण १७ जागांसाठी निवडणूक होत असून तारळे ग्रामपंचायतीत सत्तांतर होणार की जैसे थे स्थिती राहणार, हे काही दिवसातच स्पष्ट होईल.
तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून १०७ ग्रामपंचायतींपैकी ३५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. आता ७२ ग्रामपंचायतींसाठी लढत होत आहे. त्यापैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या तारळे ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. सध्या या ग्रामपंचायतीवर मंत्री शंभूराज देसाई गटाची सत्ता आहे. तारळे विभाग हा देसाई गटाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, आता ती परिस्थिती राहिलेली नाही.
२०११ सालच्या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीने बाजी मारली होती. आणि दहा जागा मिळवल्या होत्या. तर देसाई गटाला पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आत्ताची निवडणुकही देसाई गटाला सोपी राहिलेली नाही.
यावेळच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी गट आणि भाजपच्या रामभाऊ लाहोटी यांच्यात आघाडी झाली आहे. ग्रामपंचायतीच्या एकूण १७ जागांपैकी राष्ट्रवादी अकरा जागांवर तर भाजपा सहा जागांवर निवडणूक लढवत आहे. तसेच जाधव गल्ली या वॉर्डसाठी अपक्ष म्हणून सोमनाथ पाटील हे रिंगणात आहेत.
राष्ट्रवादी आणि भाजप यांनी केलेल्या आघाडीला नवलाईदेवी तारळे विकास आघाडी असे नाव आहे. तर मंत्री देसाई गटाने नवलाईदेवी विकास पॅनेल असे नाव दिले आहे. तारळे ग्रामपंचायतीची सत्ता आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी विकास जाधव, अभिजित पाटील, राजाभाऊ जाधव, एस. के. वाघडोळे आदी प्रमुख कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.
परिवर्तन करण्यासाठी विडा उचललेल्या राष्ट्रवादी आणि भाजपा आघाडीमध्ये पाटणकर गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाभाऊ जाधव, राजेंद्र जाधव, नाना पाटील, अभिजीत जाधव हे कार्यकर्ते झटत आहेत. सध्यातरी तारळे ग्रामपंचायतीची सत्ता मंत्री देसाई गटाच्या हातात आहे. त्यामध्ये १३ देसाई गट तर ४ पाटणकर गट असे बलाबल आहे.
रामभाऊ लाहोटींच्या हालचालींकडे लक्ष
ग्रामपचायतीसाठी निवडणुकीत उतरलेल्या भाजपच्या माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ लाहोटी यांच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. कारण तारळे ग्रामपंचायत असो किंवा विभागातील इतर निवडणुका असो. लाहोटी यांचा करिष्मा उठावदार दिसून आला आहे. यापूर्वी मंत्री शंभूराज देसाई यांचे खंदे समर्थक म्हणून रामभाऊ लाहोटी ओळखले जात होते. मात्र, गत पाच वर्षापुर्वी मतभेद निर्माण झाल्यामुळे ते देसाई गट सोडून भाजपमध्ये गेले.
महाविकास आघाडीचा फार्म्युला पायदळी
तारळे ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादी समर्थकांनी भाजपशी आघाडी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राज्यात असलेल्या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला तारळे ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रवादीकडून पायदळी तूडवण्यात आला असल्याचे दिसते.