राष्ट्रवादीमुळेच सहकार मोडीत निघाला
By admin | Published: January 5, 2017 11:56 PM2017-01-05T23:56:02+5:302017-01-05T23:56:02+5:30
पृथ्वीराज चव्हाण : फलटण तालुक्यातील कार्यक्रमात रामराजेंवर टीका; सामान्यांना देशोधडीला लावले
फलटण : ‘फलटण तालुक्यात सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या हिताच्या सहकारी संस्था मोडीत काढल्या. त्याचप्रमाणे केंद्रातील भाजपा सरकारने नोटाबंदीच्या नावाखाली अर्थव्यवस्था अडचणीत आणून शेतकरी व सामान्य माणसाला देशोधडीला लावले आहे. शेतकरी हिताच्या अनेक गोष्टी त्यांनी मोडीत काढल्या आहेत. फलटण तालुक्यासारखेच नेतृत्व देशाचे नेतृत्व करीत आहे,’ अशी घणघणाती टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे नाव न घेता केली.
वाठार निंबाळकर, ता. फलटण येथे स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी सुरू केलेल्या आयुर ट्रेडर्सच्या उद्घाटनप्रसंगी चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आयुर ट्रेडर्सचे प्रमुख दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, जिल्हा परिषद सदस्य महादेवराव पोकळे, आयुर आॅरग्यानिकच्या प्रमुख जयश्री आगवणे, सेंट्रल बँकेचे जनरल मॅनेजर नरेंद्र सिंह, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयकुमार शिंदे, आमीरभाई शेख, पिंटू इवरे आदी उपस्थित होते.
‘माझ्या कर्तृत्वाला पृथ्वीराज चव्हाण यांनी झळाळी दिल्याने शेतकऱ्यांसाठी उभारलेले प्रकल्प यशस्वी झाले. आता दिगंबर आगवणे यांनी उभारलेला आयुर ट्रेडर्सही यशस्वी होणार असून, तालुक्यात पाचशे शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत ट्रॅक्टर वाटप करून त्यांना मालक करणार आहे,’ असे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
आगवणे म्हणाले, ‘रामराजे हे माझ्यावर चुकीचे आरोप करीत असतात. खरे तर तालुक्यातील संस्था त्यांनी मोडीत काढल्या. साधी पिठाची चक्की त्यांना उभारता आली नाही. आम्ही आमच्या कर्तृत्वावर शेतकरी व तरुणांच्या हितांसाठी उद्योग उभारत आहोत. सामान्य माणूस मोठा होत असेल तर त्यांच्या पोटात दुखत असते.’ (प्रतिनिधी)
आयुरचेही नाव देशभरात होईल..
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वराज व लोकनेते कारखान्याची उभारणी करताना जी कर्जे घेतली ती प्रामाणिकपणे फेडल्याने दोन्ही उद्योग सुस्थितीत आहेत. दिगंबर आगवणेही रणजितसिंह यांच्याप्रमाणे यशस्वी उद्योजक होऊन सेवा करतीलच; पण जनतेच्या हितासाठी उभारलेल्या आयुरचाही नावलौकिक देशभरात होईल,’ असेही चव्हाण म्हणाले.