राष्ट्रवादीच्या २५ सदस्यांचा बंडाचा झेंडा

By admin | Published: February 8, 2016 11:08 PM2016-02-08T23:08:59+5:302016-02-08T23:23:39+5:30

जिल्हा परिषद : पदाधिकाऱ्यांचा विषय ऐरणीवर; बदल होणार नसेल तर स्वतंत्र गट; विरोधात बसण्याचीही तयारी

NCP's 25-member revolting flag | राष्ट्रवादीच्या २५ सदस्यांचा बंडाचा झेंडा

राष्ट्रवादीच्या २५ सदस्यांचा बंडाचा झेंडा

Next


सातारा : ‘राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात अजित पवारांच्या शब्दाला किंमत राहिली नाही,’ अशी संतापजनक खंत व्यक्त करीत सोमवारी जिल्हा परिषदेतील २५ सदस्यांनी बंडाचा इशारा दिला. ‘पदाधिकाऱ्यांचा राजीनामा घेता येत नसेल तर स्वतंत्र गट निर्माण करावा लागेल,’ असेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान, याची कुणकुण लागताच या ठिकाणी घाईगडबडीने आलेले पक्षप्रतोद बाळासाहेब भिलारे यांनी दूरध्वनीवरून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी या बंडखोरांना ‘बुधवारपर्यंत थांबा,’ असा सबुरीचा सल्ला दिला.
जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहावर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीचे संतप्त सदस्य जमले. यामध्ये सतीश चव्हाण, राजू भोसले, अनिल देसाई, सुभाष नरळे, मेघना चव्हाण, किरण साबळे-पाटील, सुषमा साळुंखे, विजयमाला जगदाळे, जितेंद्र सावंत यांच्यासह खासदार उदयनराजे भोसले गटाचे संदीप शिंदे, किशोर ठोकळे, वनिता पोतेकर, आदी उपस्थित होते. ‘पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याबाबत आजच काय तो निर्णय घ्या. ज्यांनी राजीनामे दिले आहेत, ते तरी मंजूर करून घ्या,’ अशी मागणी अनेक सदस्यांनी यावेळी तावातावाने केली.
ही घटना समजताच जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद बाळासाहेब भिलारे या ठिकाणी आले. यावेळी बहुतांश सदस्यांनी त्यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली. ‘अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्या शब्दालाही पक्षात किंमत राहिलेली नाही. नेत्यांचे आदेश न मानता पदाधिकारी पदाला चिकटून बसतच असतील, तर आम्ही राजीनामा देतो, अथवा स्वतंत्र राहतो,’ अशी निर्वाणीची भाषा यापैकी अनेकांनी वापरली. यावेळी उदयनराजे गटाच्या सदस्यांनी आपल्या नेत्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘राजेंनी कुठलाही निर्णय घेण्याबाबत कसलीच सूचना केलेली नाही,’ असे या सदस्यांनी स्पष्ट केले. (पान २ वर)


उदयनराजेंचीही घेतली भेट
ही बैठक आटोपल्यानंतर राष्ट्रवादीचे हेच सदस्य शासकीय विश्रामगृहावर खासदार उदयनराजे भोसले यांना जाऊन भेटले. यावेळी मात्र ही संख्या ३० पर्यंत गेली होती. ‘मी तुमच्यासोबतच आहे.
उपाध्यक्षांचा राजीनामा काय, एका मिनिटात घेऊ शकतो, पण आमची चर्चा तर होऊ द्या,’ असे उदयनराजेंनी सांगितले. याबाबत येत्या एक-दोन दिवसांत खासदार उदयनराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे एकत्र बसून निर्णय घेण्याची शक्यता आहे.

१० तारखेपर्यंत थांबा...
राष्ट्रवादीच्या नाराज सदस्यांना रामराजेंनी समजुतीने सांगताना, ‘दहा तारखेपर्यंत थांबा. एकत्र बसून सर्वजण तोडगा काढू. तोपर्यंत घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका,’ असे सांगितल्याने या सदस्यांनी रामराजेंच्या शब्दाला मान देऊन बुधवारपर्यंत थांबण्याचे ठरविले.

Web Title: NCP's 25-member revolting flag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.