राष्ट्रवादीची गोची.. शिवेंद्रराजेंना रान मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:11 AM2019-07-26T00:11:46+5:302019-07-26T00:27:59+5:30

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्या. शिवेंद्रसिंहराजे भोसले वगळता इतर सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. ...

NCP's gauchi .. Shivinderrajan's ranks | राष्ट्रवादीची गोची.. शिवेंद्रराजेंना रान मोकळे

राष्ट्रवादीची गोची.. शिवेंद्रराजेंना रान मोकळे

Next
ठळक मुद्देअखेर शिवेंद्रराजे फिरकलेच नाहीत ..पक्ष सोडणार नाहीत राष्ट्रवादीला आशा - दीपक पवारांना मिळाली महामंडळाची ताकद

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी मुलाखती घेतल्या. शिवेंद्रसिंहराजे भोसले वगळता इतर सर्व इच्छुक उमेदवार उपस्थित होते. त्यांच्या मुलाखतीही झाल्या; पण सर्व उपस्थितांपैकी शिवेंद्रराजेंच्या अनुपस्थितीची चर्चा अधिक रंगली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना आणखी बळ मिळाले. त्यातच दीपक पवार यांची भाजपने पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड करून शिवेंद्रसिंहराजेंना रान मोकळेच करून दिले. तरीही शिवेंद्रराजे राष्ट्रवादीसोबतच आहेत, अशी भाबडी आशा राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागून राहिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी गेली १० वर्षे सातारा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. अंतर्गत कुरबुरी आणि त्या सोडविण्याकडे पक्षातील वरिष्ठ नेते करत असलेले दुर्लक्ष यामुळे आपल्याच पक्षात आपणच सुरक्षित नसल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते भाजपच्या संपर्कात होते. भाजपनेही त्यांच्यासाठी पायघड्याच घातल्या आहेत. शिवेंद्रसिंहराजे जर भाजपमध्ये आले तर जिल्हा सहकारी बँक, सहकारी उद्योग आणि सातारा तालुकाच भाजपच्या मागे जाणार आहे; पण मनाने भाजपकडे ओढ घेतलेल्या शिवेंद्रराजेंना राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या तरी वळणावर थांबविणार का नाही? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सातारा विधानसभा मतदारसंघ हा अत्यंत महत्त्वाचा बुरूज. हा एकदा ताब्यात आला तर पुढील मतदारसंघांत शिरकाव करणे सोपे होणार आहे. खासदार उदयनराजे यांना देखील भाजपने आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला होता; पण शेवटपर्यंत ते काही भाजपच्या हाती लागले नाहीत; पण आता शिवेंद्रसिंहराजेंसाठी गळ टाकून त्यांच्या मार्गातील अडचणी दूर करून त्यांना रस्ता मोकळा करून देण्याचे काम भाजपने केले. सातारा आणि जावळीमध्ये आत्तापर्यंत शिवेंद्रराजे आणि दीपक पवार अशीच लढत पाहिली जात होती; पण दीपक पवार यांना राज्यमंत्रिपद देऊन त्यांना लढण्याची गरजच नाही, अशा प्रकारचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंकडे भाजपमध्ये न जाण्यासाठी अडथळा ठेवलेला नाही.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील हाच सर्वात महत्त्वाचा फरक जाणवत आहे. बाहेरून लोकांना आपल्याकडे घेण्यासाठी जागा निर्माण केल्या जात आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे त्याच लोकांना सांभाळण्याची तसदी घेतली जात नाही. त्यामुळे बाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.

उमेदवारी मिळविण्यासाठी वाट्टेल ते करण्याची धडपड करणारे इच्छुक उमेदवारी देण्यासाठी पक्षाने आयोजित केलेल्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहतात. यावरूनच त्यांना पक्षाबाबतची नाराजी किती आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आता प्रत्येकजण आपल्यापरीने त्याचे तर्क आणि अनुमान काढू लागले आहेत. खासदार उदयनराजे यांनी खासदारकीसाठी इच्छुक म्हणून अर्ज दाखल न करता त्यांना उमेदवारी देण्यात आली. मग, शिवेंद्रराजेंनीही तसेच केले तर काय फरक पडला? अजित पवार यांनी तर आपणही उमेदवारीसाठी अर्ज केला नसल्याचे सांगत शिवेंद्रसिंहराजेंच्या कृतीला दुजोराच दिला; पण हेच सांगताना त्यांनी कामाच्या व्यस्ततेमुळे चूक झाली, यापुढे काळजी घेऊ, असे सांगण्यासही विसरले नाहीत.

दोन्ही पवार आले तरी शिवेंद्रसिंहराजे गैरहजर
काही दिवसांपूर्वी ‘रयत’मधील बैठकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार साताºयात आले होते. रामराजेंसह पक्षाचे बहुतांश आमदार त्यांच्या भेटीसाठी गेले; परंतु आमदार शिवेंद्रसिंहराजे त्यांच्या भेटीला गेले नव्हते. आता राष्ट्रवादीचे दुसरे नेते आमदार अजित पवार आले तरी शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांनी भेट घेतली नाही. याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.


सकाळी जीममध्ये.. दुपारी जिल्हा बँकेत
कोणतीही जबाबदारी घेण्यासाठी समर्थ असलेले शिवेंद्रराजे यांनी व्यायाम, धावणे, सायकलिंग याकडे अधिक लक्ष दिले आहे. त्यामुळेच लोकसभेवेळी खासदार उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंचा खांदा दाबल्यावर आपले खांदे मजबूत आहेत. प्रात्यक्षिक करून दाखवू का? असा टोला मारला होता. गुरुवारी अजित पवार आल्यानंतर त्यांनी शिवेंद्रराजेंना फोन केला, त्यावेळी ते जीममध्ये होते. तर दुपारी जिल्हा बँकेत होते. कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांना मुलाखतीला उपस्थित राहता आले नाही, असेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले.

दीपक पवार लढणार की शांत बसणार...
भाजपने दीपक पवार यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळावर निवड करून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला असला तरी ते सातारा-जावळी मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाहीत, असे मात्र निश्चित नाही. अजूनही ते आपणच निवडणूक लढविणार, याबाबत ठाम आहेत.

Web Title: NCP's gauchi .. Shivinderrajan's ranks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.