राष्ट्रवादीचा ‘जायंट किलर’ आक्रमक

By admin | Published: November 19, 2014 08:56 PM2014-11-19T20:56:32+5:302014-11-20T00:01:01+5:30

पक्षाची पुनर्बांधणी : शशिकांत शिंदेंच्या रुद्रावताराने कोरेगावातील अनेकांना फुटला घाम

NCP's 'Giant Killer' aggressor | राष्ट्रवादीचा ‘जायंट किलर’ आक्रमक

राष्ट्रवादीचा ‘जायंट किलर’ आक्रमक

Next

कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विक्रमी विजय संपादन करत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा ‘जायंट किलर’ ठरलेल्या आमदार शशिकांत शिंंदे यांनी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच खुले भाष्य करून निवडणुकीत गद्दारी करणाऱ्यांना सज्जड दम भरला आहे. मंत्रिपदामुळे गेले दीड वर्ष तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करणाऱ्या आ. शिंंदे यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत नव्याने पक्षबांधणी करण्याचा निर्णय जाहीर केल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून कोरेगाव तालुक्यात आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांचे प्रचंड मोहोळ आहे. सक्षम पदाधिकारी आणि गाव-वाडीवस्तीवर पक्षाचा कार्यकर्ता ही राष्ट्रवादीची भक्कम बाजू आहे. अपवाद वगळता सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकत राहिला आहे. डॉ. शालिनीताई पाटील यांच्या आमदारकीच्या दोन्ही टर्मच्या वेळी कारखाना गट आणि राष्ट्रवादी असे वेगवेगळे प्रवाह होते. पुढे तार्इंना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखविल्यानंतर त्यांचा गट काँग्रेसच्या संपर्कात गेला आणि राष्ट्रवादीच्या गटाने पक्षसंघटना ताब्यात घेत तालुक्यावर वर्चस्व कायम ठेवले.
२००९ मध्ये जावली मतदारसंघ रद्द झाल्याने तेथील आमदार शशिकांत शिंंदे यांना कोरेगावातून राष्ट्रवादीने संधी दिली. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी मतदारसंघ पिंंजून काढून यश मिळवले. विजयी झाल्यानंतर त्यांनी पक्षसंघटना बळकट करण्यास सुरुवात केली. प्रत्येक सक्षम कार्यकर्त्यास कुवतीप्रमाणे योग्य पदावर संधी दिली. काहींना राज्यपातळीवर काम करण्यास मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकीतदेखील लक्ष घालत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले; मात्र त्याच काळात अनेकजण दुखावले गेले आणि काहींनी पक्षाशी काडीमोड घेतला. सुरुवातीला काहीसा त्याचा परिणाम जाणवला नाही; मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत त्याचा फटका आ. शिंंदे यांना बसला. जिल्हा परिषदेत केवळ दोन तर पंचायत समितीत सात सदस्य निवडून आले. काही ठिकाणी दगाफटका झाल्याने राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीचा पराभव केल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर मिळालेल्या वेळेचा योग्य वापर करण्यास आ. शिंंदे यांनी सुरुवात केली; मात्र अनपेक्षितरीत्या कॅबिनेट मंत्रिपद आणि जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर शिंंदे यांचे मतदारसंघात लक्ष कमी झाले. सततच्या मुंबईवाऱ्या आणि जिल्ह्याच्या जबाबदारीमुळे इच्छा असूनही त्यांना मतदारसंघात पक्षबांधणी करता आली नाही.
विधानसभा निवडणुकीवेळी कोणताही दगाफटका होऊ नये याची पुरेपूर खबरदारी शिंंदे यांनी घेतली होती. त्यांनी आपली हक्काची यंत्रणा जवळ ठेवलीच; त्याचबरोबर प्रमुख पदाधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद गटाची स्वतंत्र जबाबदारी सोपविल्याने त्यांना निवडणुकीत चांगले मताधिक्य घेऊन यश मिळवता आले. मात्र काही ठिकाणी अपेक्षा नसताना दगाफटका झाला आणि पक्षाला कमी मते मिळाली. राज्यातील प्रमुख विजयी उमेदवारांमध्ये आपला समावेश राहावा यासाठी शिंंदे यांनी मनापासून प्रयत्न केले; मात्र पक्षातीलच काही लोकांनी साथ सोडल्याने मताधिक्यात घट झाली. गावोगावच्या आणि वॉर्डनिहाय मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर पक्षाला खरा आरसा दिसला. त्यातून सुरु झाली दुरुस्ती मोहीम. पक्षात राहून आणि व्यासपीठावर योग्य पोझिशन मिळवायची आणि निवडणुकीत आपला करिष्मा दाखवायचा, असे काही कार्यकर्त्यांचे तंत्र उघडे पडल्याने आता त्यांचा ‘हिशेब’ करण्याची वेळ आल्याचे आ. शिंंदे यांना वाटते. सततच्या जनसंपर्कामुळे सामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेतली होती. काही ठिकाणी उलट्या बेरजा झाल्या असल्या, तरी त्यामुळे आपला कोण हे आपण ओळखले असल्याने यापुढे चुकलेल्यांना माफ न करण्याचे धोरण ठेवणार असल्याचे त्यांचे विधान सूचक आहे. (प्रतिनिधी)

कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले
‘पंचायत समितीत पूर्वीप्रमाणेच दर पंधरा दिवसांनी जनता दरबार घेण्याची प्रथा सुरू ठेवणार आहे. मी मोठ्या मनाने सर्वांना जवळ करतो; परंतु पाठीत खंजीर खुपसण्याचे काम यापुढे कोणी करू नये. विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी राखलेले ऐक्य व एकजूट आगामी काळातील सर्वच निवडणुकांमध्ये कायम ठेवावी. राज्यात सत्ता नसली, तरी तालुक्यातील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी नव्याने पक्षबांधणी करू,’ अशी डरकाळी आ. शिंंदे यांनी कोरेगावच्या सत्कार सोहळ्यात फोडल्याने कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title: NCP's 'Giant Killer' aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.