बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची पकड ढिली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2021 12:21 PM2021-11-24T12:21:09+5:302021-11-24T12:21:51+5:30
सागर गुजर सातारा : जिल्हा बँक निवडणुकीच्यानिमित्ताने एकमेकांची जिरविण्याच्या नादात राष्ट्रवादीची बालेकिल्ल्यातच पिछेहाट सुरू झालीय. १९९९ पासून जिल्ह्यावर असलेली ...
सागर गुजर
सातारा : जिल्हा बँक निवडणुकीच्यानिमित्ताने एकमेकांची जिरविण्याच्या नादात राष्ट्रवादीची बालेकिल्ल्यातच पिछेहाट सुरू झालीय. १९९९ पासून जिल्ह्यावर असलेली राष्ट्रवादीची पकड ढिली झाल्याचे चित्र असून, भाजपने शिरकाव, तर शिवसेनेने जिल्हा बँकेत प्रवेश करून भविष्यातील संघर्षाचे रणशिंग फुंकले आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय पॅनेल तयार करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र भाजपला सोबत घेऊन शिवसेना व काँग्रेस या मित्रपक्षांना बाजूला ठेवणाऱ्या राष्ट्रवादीचे बँकेतील संख्याबळ १२ वर घसरले आहे, तर भाजपचे संख्याबळ वाढल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. भविष्यामध्ये विरोधक एकत्रित येऊन राष्ट्रवादीसमोर पर्याय उभा करू शकतात, असे चित्र असून, राष्ट्रवादी अल्पमतात जाण्याची शक्यताही आहे.
जावली, कोरेगाव, खटाव हे सोसायटी मतदारसंघ खरे तर राष्ट्रवादीचे हक्काचे आहेत. जावलीतून आमदार शशिकांत शिंदे, कोरेगावातून शिवाजीराव महाडिक, तर खटावमधून नंदकुमार मोरे यांना पराभवाला तोंड द्यावे लागले आहे. या निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे हक्काचे लोक दुखावले गेले. खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांच्यासारखा मोठा नेता राष्ट्रवादीपासून बाजूला गेला. त्यांनी स्वाभिमानाने पक्षाविरोधात लढाई केली, त्यात त्यांना यश आले. तर माणमध्ये राष्ट्रवादीला झेंडा राेवता आलेला नाही. राष्ट्रवादीचे घटलेले संख्याबळ हे पक्षासाठी धोक्याची घंटा आहे.
गड आला, पण सिंह गेला
जावली सोसायटी मतदारसंघातील संघर्षमय ठरलेल्या लढतीत केवळ एका मताने आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्यामुळे राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का ठरला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचाच नव्हे, तर कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता या निकालाने हडबडला आहे. जिल्हा बँकेत पुन्हा एकदा राष्ट्रवादीचीच सत्ता आली, पण पक्षाच्या स्थापनेपासून जिल्ह्यात
पक्षवाढीसाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या जिगरबाज नेत्याच्या वाट्याला पराभव आल्यामुळे राष्ट्रवादीसाठी ‘गड आला, पण सिंह गेला’ असे झाले आहे.
निकाल ऐकताच रांजणे वाड्यावर
जावलीच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते. चुरशीच्या लढतीत ज्ञानदेव रांजणे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. निकाल जाहीर होताच ज्ञानदेव रांजणे कार्यकर्त्यांसह थेट आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या ‘सुरूचि’ निवासस्थानी दाखल झाले. त्या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. रांजणे हे तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीतच आहेत. आमदार शिंदे यांच्या पराभवानंतर ते भाजपच्या गोटात कसे?, असा प्रश्न सर्वांनाच पडला.
मानकुमरे पॉईंटवर पराभवाचे सेलिब्रेशन
पराभव झाला आमदार शशिकांत शिंदे यांचा, विजयी झाले ज्ञानदेव रांजणे आणि रंगात आले मानकुमरे, हे आज जिल्ह्याने पाहिले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असलेल्या वसंतराव मानकुमरे यांनी या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी पंगा घेतला होता. त्यामुळे रांजणे विजयी होणे त्यांच्यासाठीही महत्त्वाचे होते. हा निकाल जाहीर होताच रांजणे यांच्यापेक्षा मानकुमरे यांनी विजयोत्सव साजरा केला. मानकुमरे पॉईंटवर ‘ओ शेठ...’ तसेच ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यांच्या तालावर मानकुमरे यांनी जोरदार ठेका धरला. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेही काही काळ या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले.