राष्ट्रवादीच्या साम्राज्यात आता युतीचेही संस्थान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:21 PM2019-03-31T23:21:41+5:302019-03-31T23:21:47+5:30

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलातरी जिल्ह्यात शिवसेना-भाजपची ताकदही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. ...

NCP's organization is now in the alliance. | राष्ट्रवादीच्या साम्राज्यात आता युतीचेही संस्थान..!

राष्ट्रवादीच्या साम्राज्यात आता युतीचेही संस्थान..!

Next

नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलातरी जिल्ह्यात शिवसेना-भाजपची ताकदही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतींचा विचार करता आज युतीकडे झेडपीत १०, पंचायत समितीत १९ आणि पालिका व नगरपंचायतीत ४१ सदस्य आहेत. तर भाजपकडे ३ आणि शिवसेनेकडे १ नगराध्यक्षपद आहे. काही फरकाने राष्ट्रीय काँग्रेसच्या बरोबरीने युतीची ताकद आहे.
सातारा जिल्ह्यावर एकेकाळी काँग्रेसची मजबूत पकड होती; पण १९९१ नंतर या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढू लागली. १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन जावळी विधानसभा मतदार संघातून सदाशिव सपकाळ यांच्या रुपाने पहिल्यांदाच शिवसेनेचा आमदार निवडून आला. याच्या दुसऱ्याच वर्षी १९९६ ला सातारा लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर हे खासदार झाले. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे दिग्गज समजले जाणारे व खासदार असणाऱ्या प्रतापराव भोसले यांचा पराभव केला होता. त्यामुळे सेनेचा विस्तार वाढू लागला. त्यानंतर शिवसेनेची ही ताकद अगदी २००४ पर्यंत कायम होती. त्यावर्षीच लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेचे हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील यांच्याकडून अवघ्या काही हजार मतांच्या फरकाने पराभव झाला होता.
असे असलेतरी १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळेपासून जिल्ह्यात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच भारी ठरली. यानंतरच्या काळात राज्यात आघाडीचे सरकार आले आणि युती म्हणण्यापेक्षा शिवसेना कमकुवत होत गेली ती २०१४ मध्ये युतीचे सरकार येईपर्यंत; पण २०१४ ला देशात आणि राज्यात युतीचे सरकार आल्यापासून शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद वाढण्यास सुरुवात झाली.
यापाठीमागे भाजपच्या मंत्र्यांचे प्रयत्न आणि पाठपुरावा महत्त्वाचा ठरला. शिवसेनेचा पालकमंत्री असलातरी त्यांनी कधीही पक्षवाढीकडे लक्ष दिले नसल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवितात. तर युतीच्या राज्यातील सत्तेनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत काँग्रेसपेक्षा अधिक सदस्य सेना-भाजपचे आहेत. तर नगरपालिका आणि नगरपंचायतींचा विचार करता राष्ट्रवादीचे १२७ नगरसेवक असून, काँग्रेसचे ८५, भाजप २९ आणि सेनेचे १२ आहेत. जिल्ह्यातील नगराध्यक्षपदेही शिवसेनेकडे १ आणि भाजपकडे ३ आहेत.
भारतीय जनता पक्षामध्ये गेल्या काही वर्षांत अनेक मातब्बरांनी प्रवेश केल्यामुळे भाजपची ताकद वाढली आहे. हे सत्र गेल्या दोन दिवसांपर्यंत सुरूच होते. त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेस नसली तरी राष्ट्रीय काँग्रेसच्या बरोबरीने युती जाऊ लागली आहे.

विविध ठिकाणची पक्षनिहाय सदस्य संख्या
पक्ष जिल्हा परिषद पंचायत समिती पालिका व नगरपंचायत
राष्ट्रवादी ४० ७० १२७
काँग्रेस ७ १६ ८५
भाजप ७ १० २९
शिवसेना ३ ९ १२

Web Title: NCP's organization is now in the alliance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.