राष्ट्रवादीतल्या ‘बेकीचे नियोजन’ चव्हाट्यावर

By admin | Published: February 2, 2015 09:28 PM2015-02-02T21:28:33+5:302015-02-02T23:58:49+5:30

रामराजे-शिंदेंची अस्वस्थता वाढली : अजित पवारांच्या दौऱ्यात व्यासपीठावर उघडपणे संताप व्यक्त

NCP's 'planning for' | राष्ट्रवादीतल्या ‘बेकीचे नियोजन’ चव्हाट्यावर

राष्ट्रवादीतल्या ‘बेकीचे नियोजन’ चव्हाट्यावर

Next

सातारा : नियोजन बैठकीत खासदार उदयनराजेंनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादी नेत्यांचा संताप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यात उघडपणे व्यक्त झाला. शिरवळ अन् सोनके येथील कार्यक्रमात व्यासपीठावरच रामराजे आणि शशिकांत शिंदे यांनी अत्यंत तिखट भाषेत आपली भावना व्यक्त केली. उदयनराजेंचे नाव न घेता ‘अतिरिक्त पालकमंत्री’ म्हणून त्यांचा उल्लेख केला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीतल्या ‘बेकीचे नियोजन’ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे.पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा गुरुवारी येथील नियोजन भवनात झाली. या बैठकीत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी चौफेर फटकेबाजी केली होती. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना उदयनराजेंच्या खोचक टीकांनाही सामोरे जावे लागले होते. या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या गोटात पसरलेली अस्वस्थता मात्र  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यात समोर आली.
सोनके, ता. कोरेगाव येथे झालेल्या सहकार व शेतकरी मेळाव्यात माजी जलसंपदामंत्री रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उदयनराजेंचे नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेतला. नियोजन बैठकीत उदयनराजेंनी पाटबंधारे खात्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यावरून पक्षामधील लोकंच पालकमंत्र्यांना सामील होऊन केवळ नाटकबाजी करत असल्याचा आरोप रामराजे यांनी केला.एवढेच नव्हे तर पालकमंत्र्यांच्या बाजूला बसून त्यांच्यासारखेच बोलत असल्याने ते म्हणजे ‘अतिरिक्त पालकमंत्री’ अशी टीकाही रामराजेंनी केली. जर कोणी पक्ष संपविण्याची भाषा करीत असेल, तर आम्हालाही तशीच भूमिका घ्यावी लागेल. विकासकामासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज असून, वेळेप्रसंगी रक्त सांडण्याची तयारी ठेवावी लागेल, असेही राजराजे म्हणाले. शिरवळ येथील कार्यक्रमातही रामराजे यांनी नियोजन समितीत अनेक  मार्गदर्शक निर्माण झाले असल्याचे सांगून विकासाचे राजकारण संपुष्टात आणणारे राजकारण सुरू असल्याची भावना व्यक्त केली होती.माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनीही नियोजन बैठकीनंतर ‘बघून घेतो’ ची भाषा केली होती. यानंतर उदयनराजेंचीही ‘तुम्ही काय, आता मीच बघून घेतो,’ अशी उलटप्रतिक्रया दिली होती.उदयनराजेंची आक्रमक भूमिका आणि त्यांचे वक्तव्य कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले असून, पक्षात असलेली खदखद आता हळूहळू समोर येऊ लागली आहे. (प्रतिनिधी)

सत्तांतरानंतर उदयनराजे अधिकच आक्रमक
लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील काही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे उदयनराजे भोसले यांना उमेदवारी न देण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न केले होते. मात्र, सर्वांचाच अपेक्षा भंग झाला. पक्षाने उदयनराजेंना उमेदवारी दिली आणि उदयनराजेंनी वरिष्ठांचा विश्वास सार्थही करून दाखविला. सत्तांतरानंतर मात्र उदयनराजे भोसले यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. पूर्वी ते केवळ टोमणा मारत होते; मात्र आता उघड-उघड टीका करण्यातही ते मागे-पुढे पाहत नाही.

Web Title: NCP's 'planning for'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.