राष्ट्रवादीची प्रतिष्ठा तर काँग्रेसचे अस्तित्व पणाला
By admin | Published: November 16, 2016 11:11 PM2016-11-16T23:11:20+5:302016-11-16T23:11:20+5:30
ंशेखर गोरेंसाठी नेत्यांची फळी कामाला...
सातारा : विधानपरिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे उमेदवार शेखर गोरे यांच्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांची फळी जोरदार कामाला लागली आहे. काँगे्रसतर्फे नात्या-गोत्यांचे गणित मांडले गेले तरी पक्षाची भूमिका महत्त्वाची असे स्पष्ट करत राष्ट्रवादीचे सर्वच आमदार मते फुटू नयेत, याची मोठी काळजी घेताना पाहायला मिळत आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणावर असलेली राष्ट्रवादीची पकड ढिली न होऊ देता, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणाऱ्या ताकदीच्या बळावर राष्ट्रवादीने काँगे्रसपुढे आव्हान उभे केले आहे. म्हसवड, पाचगणी पालिका व मलकापूर नगरपंचायत वगळता सातारा, वाई, फलटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, रहिमतपूर या पालिकांत तसेच लोणंद नगरपंचायतीत पालिकेची सत्ता आहे. या सर्वच पालिकांमध्ये काँगे्रसचे बळ राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी आहे. जिल्हा परिषदेतही ६७ पैकी ३७ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत.
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यावरच राष्ट्रवादीची मदार असून या नेत्यांच्या ताब्यातच बहुतांश सत्तास्थाने असल्याने त्यांनी मते फुटू नयेत, याची विशेष काळजी घेतल्याचे चित्र सध्या आहे. या मतदारसंघासाठी जिल्ह्यात ३0४ मतदार आहेत. यापैकी बहुतांश मतदान खेचण्यासाठी शेखर गोरे यांनी ‘व्यूव्हरचना’ आखली आहे. (प्रतिनिधी)