राष्ट्रवादीचे संजीवराजे सातारा जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष
By Admin | Published: March 21, 2017 03:24 PM2017-03-21T15:24:53+5:302017-03-21T15:24:53+5:30
वसंतराव मानकुमरे यांची उपाध्यक्षपदी घोषणा
आॅनलाईन लोकमत
सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष म्हणून अपेक्षेप्रमाणे संजीवराजे नाईक-निंबाळकर यांची घोषणा करण्यात आली. उपाध्यक्षपदी वसंतराव मानकुमरे यांचीही निवड झाली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात तीन वाजता ही निवड जाहीर करण्यात आली. निवड होताच सदस्यांनी टाळ्या वाजवून नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले, तसेच समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या आवाराबाहेर फटाक्यांची माळ लावून आनंद व्यक्त केला.
जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचेच खासदार उदयनराजेंची बंडखोरी, पृथ्वीराज चव्हाणांच्या कॉँग्रेसची आक्रमकता अन्न व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची व्यूहरचना मोडीत काढत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविल्याबद्दल फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्याला बारामतीकरांनी शाबासकी दिलीय. अध्यक्षपदाची माळ रामराजेंचे बंधू संजीवराजे यांच्याच गळ्यात विसावली असून आमदार शिवेंद्रसिंहराजे गटालाही सांभाळून घेण्याची हुशारी बारामतीकरांनी दाखविलीय. निवडणुकीत उदयनराजेंच्या ताफ्यातील गाड्यांवर तुफान दगडफेक करणाऱ्या वसंतराव मानकुमरेंना त्यांच्या धाडसाची बक्षिसी मिळाली असून उपाध्यक्षपद त्यांच्याकडे सोपविण्यात आलंय.
जिल्हा परिषदेत ६४ पैकी ४० जागा ताब्यात मिळविणारा राष्ट्रवादी पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून, पक्षाने बहुमतही मिळविले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्यांची बैठक जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी घेतली होती.
या निवडणुकीदरम्यान शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, शेखर गोरे, बाळासाहेब भिलारे, प्रतापराव पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
(प्रतिनिधी)
संजीवराजे सलग सहाव्यांदा जिल्हा परिषदेत
संजीवराजे नाईक-निंबाळकर हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू आहेत. त्यांचे वडील शिवाजीराजे नाईक-निंबाळकर हे १९७८ मध्ये आमदार म्हणून निवडून आले होते. १९९२ साली रामराजे, संजीवराजे व रघुनाथराजे यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रारंभी नगरपालिका निवडुकीत सत्ता स्थापन केल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत संजीवराजे हे बरड जिल्हा गटातून निवडणू आले. त्याचवेळेस पंचायत समितीचे सभापदीपदही त्यांनी भूषविले. जिल्हा परिषदेत सलग सहा वेळा सदस्य म्हणून ते निवडून आले असून यापूर्वी उपाध्यक्षही भूषविले आहे.
सभापती ते उपाध्यक्ष; मानकुमरेंचा प्रवास
मुंबई येथील वसंतराव मानकुमरे यांची राजकीय कारकीर्द जावली पंचायत समितीच्या सभापतीपदापासून सुरू झाली. सभापतीपदावर असताना ते शिवसेनेत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश करून २००७ साली हातगेघर जिल्हा परिषद गटातून निवडूण येत अर्थ शिक्षण समिती सभापतीपद भुषविले. २०१७ साली हा गटा खुुल्या प्रवर्गार्साठी आरक्षीत झाल्यामुळे मानकुमरे या गटातून मताधिक्याने निवडून आले. राष्ट्रवादीतर्फे त्यांना प्रथमच जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा बहुमान मिळाला आहे.