पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक सातारा जिल्ह्यात दाखल
By नितीन काळेल | Published: July 2, 2024 06:20 PM2024-07-02T18:20:58+5:302024-07-02T18:21:44+5:30
पश्चिम भागात पाऊस वाढला : ३० जणांचा समावेश; पावसाळ्यात कार्यरत राहणार
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत चालल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे मदतीसाठी एनडीआरएफचे (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ३० जणांचे पथक जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पथक संपूर्ण पावसाळ्यात कार्यरत असणार आहे. तसेच आपत्तीच्या काळात मदतही करणार आहे.
जिल्ह्यात तीन वर्षांपूर्वी धुवाधार पाऊस झाला होता. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा आदी नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली होती. तर काही नद्यांच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली होती. पाणी पात्राबाहेर पडलेले. त्याचबरोबर पश्चिम भागात अनेक ठिकाणी दरडी कोसळून गावावर आल्या होत्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. त्यामुळे जिल्हा प्रशासन पावसाळ्यापूर्वी विविध उपाययोजना करते. तसेच नागरिकांच्या जीविताचीही काळजी घेते. यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक बोलवण्यात येते. यावर्षीही हे पथक आले आहे.
सध्या पथक कऱ्हाडमध्ये आहे. पावसाळ्याच्या काळात पथक कार्यरत राहणार आहे. तसेच पूरप्रवण आणि नागरिकांना धोका निर्माण होईल अशा ठिकाणी मदतीसाठी जाणार आहे. त्यातच कऱ्हाड येथे कोयना आणि कृष्णा नदीचा संगम होतो. त्यामुळे अतिवृष्टीत कृष्णा नदीला पूर येतो. अशा काळात या पथकाची मोठी मदत होणार आहे.
जिल्हा प्रशासनाने नदीकाठची संभाव्य पूरप्रवण गावे निश्चित केली आहेत. यामध्ये सर्वाधिक गावे ही कऱ्हाड तालुक्यात ५५ आहेत. तर जिल्ह्यात १७२ गावांना पुराचा धोका राहतो. या गावांवर प्रशासनाचे लक्ष राहणार आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलही पूरस्थितीच्या काळात दक्ष असणार आहे.
पथकात दोन पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी..
कऱ्हाडमध्ये दाखल झालेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकात ३० जणांचा समावेश आहे. ही तुकडी पुणे येथून आलेली आहे. त्यांच्याबरोबर पूरस्थितीत मदत करण्यासाठी लागणारे साहित्यही आहे. या पथकात पोलिस निरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी आहेत. टीम कमांडर सुजीत पासवान, निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक असेल. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यातच नदीकाठच्या रहिवाशांसाठी पूरस्थितीतील धोका टाळण्यासाठी प्रशिक्षण घेतले होते. यामध्ये पोलिस, होमगार्ड आदी सहभागी झालेले.