कोयनेतील पाणीसाठा ९४ टीएमसीजवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:41 AM2021-08-23T04:41:59+5:302021-08-23T04:41:59+5:30
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असून, कोयना धरणात ९३.६६ टीएमसी इतका साठा झाला आहे, तर जिल्ह्यातील ...
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असून, कोयना धरणात ९३.६६ टीएमसी इतका साठा झाला आहे, तर जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. सध्या सर्वच धरणात ८५ टक्क्यांवर पाणीसाठा झालेला आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात महिन्यापूर्वी धुवाधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाण्याची आवक झाली. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला, तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी यासारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. परिणामी धरणांमधून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला व पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यात आली.
सध्या पश्चिम भागात पाऊस तुरळक होत आहे. प्रमुख धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे, तर कोयना धरणात तुरळक आवक होत आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळपासूनच धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे, तर १५ दिवसांपूर्वीपासूनच धरणाचे दरवाजे बंद आहेत.
रविवारी सकाळपर्यंत कोयनेला जून महिन्यापासून ३५७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला आतापर्यंत ४६३१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला यावर्षी आतापर्यंत ४८०३ मिलिमीटर पर्जन्यमान नोंद झालेले आहे.
............................................................................