वारी आली जवळ; तरीही चौकीला कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 10:57 PM2018-07-04T22:57:45+5:302018-07-04T22:57:50+5:30
वाठार स्टेशन : लोणंद राज्यमार्गावरील सालपे घाट तसेच फलटण मार्गावरील आदर्की घाट यांच्या घाटमाथ्यावर असलेली पोलीस चौकी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ही चौकी स्थापन केल्यानंतर अनेक वर्षे घाट रस्त्यातील लुटमारीच्या घटना कमी झाले होत्या. मात्र, जस जसे अधिकारी बदलत गेले तशी या चौकीची दुरवस्था वाढत गेली. यासाठी आता ही चौकी कायमस्वरूपी सुरू राहण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातून होऊ लागली आहे.
लोणंद मुक्कामी येणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी आगमनाची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. या मार्गावरील वाठार पोलीस मात्र अजून झोपेत आहेत. या घाट रस्त्यावरील तडवळे गाव हद्दीतील आदर्की फाटा पोलीस चौकी गेली वर्षभरापासून आजही बंद आहे. वर्षातून केवळ एक दिवस उघडली जाणारी ही चौकी किमान पालखी सोहळ्यात तरी सुरू राहावी, अशी मागणी या परिसरातील प्रवासी व ग्रामस्थांतून होत आहे.
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील ४७ गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या वाठार पोलीस ठाणे हद्दीत सध्या सर्वप्रकारच्या अवैध व्यवसायांचा विळखा पडला आहे. नवा राजा नवा कायदा, या म्हणीप्रमाणे काही दिवसांपूर्वीच या पोलीस ठाण्याला नवा कारभारी मिळाला असला तरी हे कारभारी गेल्या पंधारा दिवसांपासून स्वागत समारंभातच व्यस्त आहेत. लोणंद पालखी सोहळ्यादरम्यान सातारा-लोणंद राज्यमार्गावरील वाठार पोलिसांच्या अखत्यारित असलेली आदर्की फाटा पोलीस चौकी अजूनही बंदच आहे. दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या पालखी सोहळ्यापूर्वी तरी ही चौकी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
वाळू तस्करांच्या मारहाणीची नोंदच नाही
ही चौकी वर्षातून केवळ एक ते दोन दिवसच म्हणजे पालखी आगमनादरम्यान उघडली जात असल्याने आजपर्यंत अनेक प्रवाशांना लुटमारीच्या घटनांना नेहमीच सामोरे जावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी याच चौकीच्या बाजूला तडवळे, ता. कोरेगाव येथील एका युवकाला वाळू तस्करांनी बेदम मारहाण केली. मात्र याची नोंद घेणंही या पोलिसांना उचित वाटले नाही. ही चौकी सुरू असती तर किमान अशा घटनांना आळा बसण्यास मदत झाली असती.