‘कृष्णा’ स्वच्छतेसाठी प्रत्यक्ष कृती आराखड्याची गरज
By admin | Published: June 29, 2016 11:26 PM2016-06-29T23:26:05+5:302016-06-30T00:05:09+5:30
उदयनराजे भोसले : निधीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार; वाई येथील आढावा बैठकीत प्रतिपादन
वाई : सध्या कृष्णेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला असून, सातारा जिल्ह्याचे खासदार उदयनराजे भोसले व आमदार मकरंद पाटील यांनी कंबर कसली असून, जिल्हाधिकारी डॉ़ अश्विन मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा स्वच्छतेची मोहीम व्यापक स्वरूपात हाती घेण्यात आली आहे़ त्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले होते़
आढावा बैठकीस जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, आमदार मकरंद पाटील, जि़ प़ चे कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, जि़ प़ उपाध्यक्ष रवी सांळुखे, वाईच्या प्रातांधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे, गटविकास अधिकारी दीपा बापट, नगरपालिका मुख्याधिकारी आशा राऊत, नगराध्यक्ष भूषण गायकवाड, कोल्हापूरचे अभियंता उदय गायकवाड, नगरसेवक अनिल सावंत, सचिन फरांदे, धनंजय मोरे, महेंद्र धनवे, अनुराधा कोल्हापुरे, वर्षा शेवडे, कैलास जमदाडे, डॉ़ अमर जमदाडे, शोभा शिंदे, विकास शिंदे, विजयसिंह नायकवडी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी यामध्ये मकरंद शेंडे, काशीनाथ शेलार, प्रा़ बाळासाहेब कोकरे, धनंजय मलटणे, भवरलाल ओसवाल उपस्थित होते़
उदयनराजे भोसले म्हणाले, ‘कृष्णा नदीच्या स्वच्छतेच्या संदर्भात प्रत्यक्ष कृती आराखड्याची गरज असून, तो अमलात आणण्यासाठी लागणारा निधी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून मिळविण्यात येईल; पंरतु कृष्णेच्या उगमापासून संगमापर्यंत ‘स्वच्छ वाहते कृष्णामाई’ हे सत्यात उतरविल्याशिवाय शांत बसणार नाही़.’
खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी यांच्या समवेत कृष्णा नदीवर धोम, गंगापुरी घाट व गणपती घाट यांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला व नगरपालिकेच्या छ़ शिवाजी महाराज सभागृहात उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना त्यांनी कृष्णा नदीच्या स्वच्छतेबाबत लोकचवळ उभी करण्याचे आवाहन केले़
आ़ मकरंद पाटील म्हणाले, ‘कृष्णा नदीला सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व आहे़ हे एक प्रसिद्ध पर्यटन ठिकाण असून, आपल्यासाठी अस्मितेचा विषय आहे. कृष्णा अस्वच्छ होण्याचे मुख्य कारण तिच्यामध्ये सोडले जाणारे दूषित सांडपाणी हे असून, त्याची व्यवस्था केल्याशिवाय कृष्णेची स्वच्छता होणार नाही़ शहरातील सांडपाणी व्यवस्थापन आराखड्यासंदर्भात कित्येक वर्षांपासून राज्य व केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत असून, यासाठी ३५ कोटींचा अपेक्षित खर्च असून, त्यासाठी लागणारी ५० टक्के रक्कम भरण्याची वाई नगरपालिकेची अर्थिक क्षमता नाही़ त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी १०० टक्के अनुदानासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करावा व निधीची उपलब्धता करावी़ ’
आढावा बैठकीत प्रास्ताविकात मुख्याधिकारी आशा राऊत यांनी स्वच्छता अभियानाची माहिती दिली़ त्याबरोबर गटविकासधिकारी दीपा बापट, नगराध्यक्ष भूषण गायकवाड, सामाजिक संस्था प्रतिनिधी काशीनाथ शेलार, प्रा़ बाळासाहेब कोकरे यांनी मनोगत व्यक्त केले़ (प्रतिनिधी)
सामाजिक संस्था प्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांचा सन्मान
‘कृष्णा’ स्वच्छतेसाठी यापूर्वी अनेक वेळा विविध उपक्रम राबविल्याने व पालिकेच्या स्वच्छता अभियानामध्ये हिरहिरीने सहभाग घेतल्याने त्याची नोंद घेत खासदार उदयनराजे भोसले व जिल्हाधिकारी डॉ़ अश्विन मुदगल यांच्या हस्ते भगवा कट्टा प्रतिष्ठानचे काशीनाथ शेलार, समूह संस्थेचे मकरंद शेंडे, आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रा़ बाळासाहेब कोकरे, अनिरुद्ध ट्रस्टचे राजेंद्र बागुल, नगसेवक सचिन फरांदे, मुख्याधिकारी आशा राऊत यांचा सत्कार करण्यात आला़
कृष्णा स्वच्छतेसाठी तात्पुरते व कायस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे़ यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिकांच्या माध्यमातून वाई शहर तसेच कृष्णाकाठावरील सर्व गावांच्या ग्रामस्थांच्या सहभागातून १० जुलैला स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे.
- डॉ. अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी
कृष्णा नदीला दक्षिणेतील गंगा म्हणून संबोधले जाते कारण देशाचे ७० ब टक्के सिंचनाचे काम कृष्णेमधून होत़ ज्या पद्धतीने नमामी योजनेतून चंद्रभागाला विशेष निधी उपलब्ध करण्यात आला त्याप्रमाणे कृष्णेला ही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.
-खासदार उदयनराजे भोसले