राज्यघटनेतील उणिवा दुरुस्त करणे गरजेचे
By admin | Published: December 18, 2014 09:24 PM2014-12-18T21:24:57+5:302014-12-19T00:23:04+5:30
धैर्यशील पाटील यांचे प्रतिपादन
सातारा : ‘भारतीय राज्यघटनेतील उणिवा दुरुस्त न करता आल्यामुळे आज सामान्य माणसाची दुरवस्था पाहावयास मिळते. या सर्व परिस्थितीचा तरुणांनी अभ्यास करून पुढची वाटचाल करावी. तरच भविष्यकाळ सुकर होऊ शकेल,’ असे प्रतिपादन अॅड. धैर्यशील पाटील यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांना रयत शिक्षण संस्थेच्या वतीने ‘ईस्माईलसाहेब मुल्ला आदर्श रयत सेवक पुरस्कार २०१४’ देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, ‘समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, हा कर्मवीर भाऊराव पाटील यांचा दृष्टिकोन होता. त्यासाठी समाजातून हजारो हात पुढे आले. मुल्लासाहेब हे त्यातील बिनीचे शिलेदार होते. भारतीय स्वातंत्र्याचा लढा सुरू असताना वेगवेगळ्या शक्ती, वेगवेगळ्या हेतूने स्वातंत्र लढ्यात सहभागी झाल्या होत्या. मात्र, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही आज विकासाच्या नावावर सामान्य शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. हा भांडवलदार वर्गाचा डाव आहे, हे तरुणांनी लक्षात घ्यावे.
यावेळी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, अॅड. दिलावर मुल्ला, प्रभारी प्राचार्या डॉ. सुजाता पवार, प्रा. फातिमा मुजावर, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्रा. सी. डी. जडगे, सहसचिव प्राचार्य डॉ. डी. डी. पाटील, अॅड. के. व्ही. पाटील, प्राचार्य आर. डी. गायकवाड, एच. वाय. पाटील, प्राचार्य आर. के. शिंदे, प्राचार्य सायनाकर, प्रा. अजित पाटील, यांच्यासह रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकवर्ग, विद्यार्थी, पालक, उपस्थित होते. (प्रतिनिधी)