अर्थव्यवस्था काळानुसार बदलण्याची गरज

By admin | Published: August 24, 2016 11:06 PM2016-08-24T23:06:16+5:302016-08-24T23:48:00+5:30

भाई वैद्य : भिलारे गुरुजींचा ‘आबासाहेब वीर’ तर हणमंतराव गायकवाड यांचा ‘प्रेरणा पुरस्कारा’ने गौरव; मान्यवरांची उपस्थिती

The need to change the economy over time | अर्थव्यवस्था काळानुसार बदलण्याची गरज

अर्थव्यवस्था काळानुसार बदलण्याची गरज

Next

भुर्इंज : ‘शेती, उद्योग, शिक्षण अशा सार्वजनिक क्षेत्रांतील देशाची सध्याची अर्थव्यवस्था कालबाह्य झालेली असून, बदलत्या परिस्थिती व काळानुसार आजची अर्थव्यवस्था बदलण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी विचारवंत नेते भाई वैद्य यांनी केले.
किसन वीर कारखान्याचे संस्थापक किसन महादेव तथा आबासाहेब वीर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी भिकू दाजी तथा भि. दा. भिलारे गुरुजी यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक’ पुरस्कार आणि बी. व्ही. जी. (भारत विकास ग्रुप) इंडियाचे संस्थापक अध्यक्ष रहिमतपूरचे (जि. सातारा) युवा उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना पहिला ‘आबासाहेब वीर प्रेरणा’ पुरस्कार भाई वैद्य यांच्या हस्ते सन्मानपत्र, अनुक्रमे एक लाख व एकावन्न हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. भिलारे गुरुजींच्या वतीने त्यांचे सुपुत्र सुरेंद्र भिलारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापरावभाऊ भोसले अध्यक्षस्थानी होते. कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, डॉ. नीलिमा भोसले, सीताबाई गायकवाड, मधुकर नीलफराटे, खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष शंकरराव गाढवे, माजी आमदार कृष्णचंद्र भोईटे, जावळी बँकेचे अध्यक्ष विक्रम भिलारे, प्रल्हादराव चव्हाण, भिलारे गुरुजी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र तिताडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाई वैद्य म्हणाले, ‘भिलारे गुरुजी गांधीवादी विचार आणि काँग्रेस पक्षाचे तत्वज्ञान प्रमाण मानून हयातभर सार्वजनिक जीवनात कार्यरत राहिले. किसन वीर आबांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे मोलाचे योगदान होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पाचगणीत वास्तव्य असताना नथुराम गोडसेपासून गुरुजींनी त्यांचे प्राण धाडसाने वाचविले. अशा व्यक्तीचा किसन वीर परिवाराकडून झालेला सन्मान सुखद वाटतो. हणमंतराव गायकवाड यांच्याही कार्याची योग्य दखल घेत त्यांना पहिला ‘आबासाहेब वीर प्रेरणा’ पुरस्कार देऊन खऱ्या अर्थाने युवा पिढीला प्रेरणा देण्याचे काम कारखान्याने केलेले आहे. मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर साखर कारखान्याच्या प्रगतीचेही त्यांनी कौतुक केले.’
प्रास्ताविकात मदन भोसले म्हणाले, ‘आबासाहेब वीर यांनी स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले. समाजजीवन सुखी-समृद्धी व आनंदी होण्यासाठी शेवटपर्यंत कार्यरत राहिले. प्रतापरावभाऊंच्या निमित्ताने आबांशी संवाद असायचा. त्यांना पाहता, अनुभवता आले, हे मी माझे भाग्य समजतो. आबांच्या विचारांची पूजा जयंतीच्या निमित्ताने करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. आबांच्या नावाला साजेसं असं त्यांना अभिप्रेत असलेलं काम करून किसन वीर कारखान्याचा चौफेर विकास साधला. भिलारे गुरुजी आणि हणमंतराव गायकवाड यांच्या कर्तृत्व, नेतृत्व आणि समाजकार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सन्मानित करता आले, याचाही आनंद किसन वीर कारखाना परिवाराला असल्याचे त्यांनी सांगितले.’
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते किसन वीर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाने केला. मानपत्रांचे वाचन राजेंद्र शेलार व प्रताप देशमुख यांनी केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत केले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

आबासाहेब वीर माझे दैवत : भि. दा. भिलारे
प्रकृतीच्या कारणास्तव भिलारे गुरुजी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव सुरेंद्र भिलारे यांनी पुरस्कार स्वीकारून गुरुजींचा संदेश वाचून दाखविला. या संदेशात गुरुजींनी म्हटले आहे, ‘ आबासाहेब वीर यांच्या नावाने पुरस्कार मिळाला, हे मी माझे भाग्य समजतो. स्वातंत्र्य लढ्यात आबांसारखे कणखर नेतृत्व लाभल्यामुळेच स्वातंत्र्याची पहाट सर्वांना पाहता आली. महात्मा गांधींवरील हल्ला परतवून लावता आला, याचा मला अभिमान वाटतो. यशवंतराव चव्हाण आणि आबासाहेब वीर ही माझी दैवते असून, त्यांच्यामुळेच माझे जीवन घडले आहे,’ असेही भिलारे गुरुजी यांनी संदेशात म्हटले आहे.


पुरस्कारामुळे ऊर्जा : गायकवाड
पुरस्कारमूर्ती हणमंतराव गायकवाड सत्काराला उत्तर देताना म्हणाले, ‘या पुरस्कारामुळे जीवनात आणखी चांगल्या प्रकारे काम करण्याची प्रेरणा मिळाली. पुरस्काराला मी निमित्तमात्र असून, हा पुरस्कार बीव्हीजीचे साठ हजार कर्मचारी, माझी आई आणि यशाच्या या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी मदत केली, मार्ग दाखविला त्यांना अर्पण करत असल्याचे यावेळी गायकवाड म्हणाले.


सायकल ते विमानमालक
मदन भोसले म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात हणमंत गायकवाड यांना फोन केला तेव्हा, ते शांघाय येथे विमान खरेदी करण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी त्यांचा सायकलवरून सुरू झालेला प्रवास आठवला आणि हा युवा उद्योजक स्वत: विमानाचा मालक झाला याचा आनंद, अभिमान वाटला. भोसले यांच्या या वक्तव्यावर गायकवाड व त्यांच्या मातोश्री सीताबाई या दोघांनाही गहिवरून आले.’

Web Title: The need to change the economy over time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.