देशद्रोह्यांविरोधात राजेशाहीची गरज: उदयनराजे भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 10:44 PM2018-11-26T22:44:36+5:302018-11-26T22:44:40+5:30
सायगाव : ‘देशात गुन्हेगार आणि देशद्रोह्यांवर वचक ठेवण्यासाठी लोकशाहीऐवजी राजेशाहीची आवश्यकता आहे. सध्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढू लागले. हे लोकशाहीचे ...
सायगाव : ‘देशात गुन्हेगार आणि देशद्रोह्यांवर वचक ठेवण्यासाठी लोकशाहीऐवजी राजेशाहीची आवश्यकता आहे. सध्या भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढू लागले. हे लोकशाहीचे अपयश आहे. समाजातील कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. देशातून दहशतवाद हद्दपार करणे हीच तुकाराम ओंबळेंना श्रद्धांजली ठरेल,’ अशा भावना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या.
जावळी तालुक्यातील केडंबेचे सुपुत्र व मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले सहायक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त केडंबे येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार रोहिणी आखाडे-फडतरे, सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, माजी शिक्षण सभापती अमित कदम, सुनील काटकर, बाळासाहेब ढेकणे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे, एस. एस. पारटे, पंचायत समिती सदस्य कांताबाई सुतार, शिवसेना शहरप्रमुख निमेश शहा, शिरीष दिवाकर, विजयराव मोकाशी, मोहनराव कासुर्डे, मंडलाधिकारी ए. ए. मेमन, तलाठी ए. एच. मगरे, ग्रामसेवक अमोल गायकवाड, सचिन करंजेकर, रवी चिकणे, सचिन शेलार, भगवान उतेकर, सरपंच वैशाली जंगम, ए. पी. बिडवे, बंडोपंत ओंबळे, चंद्रकांत ओंबळे, नितीन पारटे, अरविंद सोमवंशी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, ‘अजमल कसाबला जिवंत पकडून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्याचे काम केडंबेचे सुपुत्र तुकाराम ओंबळे यांनी केले. तुकाराम ओंबळेंचे हे बलिदान व्यर्थ जाऊ न देता देशातून दहशतवादाला हद्दपार करणे हीच हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’
यावेळी शासनाच्या वतीने तहसीलदार आखाडे, सहायक पोलीस निरीक्षक माने यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी टी. आर. ओंबळे, राजाराम जाधव, बाळासाहेब शिर्के, शैलेंद्र सावंत, आशिष भिलारे, दत्तात्रय दरेकर, नंदू चिकणे, विकास सावंत, गणेश गोळे व वीरगर्जना बहुउद्देशीय संस्था नागेवाडीचे पदाधिकारी परिसरातील गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकर जांभळे, चंद्रकांत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. एकनाथ ओंबळे यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र जाधव, रामचंद्र ओंबळे, किरण ओंबळे, विजय ओंबळे, कुणाल ओंबळे, सुनील ओंबळे यांनी परिश्रम घेतले.
आजोबांच्या पराक्रमाची गाथा...
तुकाराम ओंबळे यांचा नातू स्वानंद ओंबळे याने ओंबळे यांच्या जीवनावर आधारित भाषण केले. यावेळी शिवसेनेच्या वतीने केडंबे शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य भेट व मेढा, सोमर्डी, कुडाळ, केळघर येथील आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.