निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार गरजेचा : पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:44+5:302021-09-25T04:42:44+5:30
खटाव : ‘निरोगी राहणे हे जीवनातील सर्वात मोठे सुख आहे. मात्र निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचा आहे. रोजच्या ...
खटाव : ‘निरोगी राहणे हे जीवनातील सर्वात मोठे सुख आहे. मात्र निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे गरजेचा आहे. रोजच्या आहारात पौष्टिक आहाराचा समावेश असल्यास कोणत्याही आजारावर व्यक्ती मात करू शकते,’ असे प्रतिपादन पर्यवेक्षिका सुमन पवार यांनी केले.
खटाव येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खटाव (वडूज) यांच्या वतीने राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहाचे अंगणवाडी बीट खटाव यांच्या वतीने आयोजन केले. यावेळी त्या बोलत होत्या. उद्घाटन सरपंच नंदकुमार वायदंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, पर्यवेक्षिका संगीता काकडे, सुप्रिया इनामदार, वर्षाराणी ओंबासे, ज्योती देशमुख, अमोल फडणीस, सुहास जोशी, विशाल देशमुख, राहुल जमदाडे उपस्थित होते.
पोषण आहार सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात खटाव बीटमधील खटाव, विसापूर, खादगुन, भांडेवाडी, रेवळकरवाडी आदी गावातून अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस व सेविका यांनी सहभाग घेतला होता. यावेळी ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ तसेच बालकांच्या कुपोषण यासंदर्भातील स्लोगन, परस बागेचे महत्त्व पटवून देणाऱ्या प्रतिकृती आणि सर्व भाज्यांचे महत्त्व व डाळींचे महत्त्व पटवून देणारे अनोख्या पद्धतीने प्रत्यक्षात भाज्यांचा वापर करून काढण्यात आलेली महाकाय प्रतिकृती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. यावेळी महिलांनी तयार केलेले विविध पौष्टिक पदार्थांचे देखील प्रदर्शन मांडण्यात आले. अंगणवाडीच्या माध्यमातून पूरक पोषण आहाराचा जागर घरोघरी पोहोचविण्याचा संकल्पही करण्यात आला.
संगीता काकडे यांनी प्रास्ताविक केले. विजया भोकरे यांनी आभार मानले.