विचारांसह बहुश्रुतपणाची गरज
By admin | Published: September 18, 2015 09:34 PM2015-09-18T21:34:22+5:302015-09-18T23:23:49+5:30
आनंद धामापूरकर : सावंतवाडीत बौद्ध सभेतर्फे कार्यकर्ता शिबिर
सावंतवाडी : सामाजिक, धार्मिक कार्य करताना नेहमीच तोंडात साखर व डोक्यात बर्फ ठेवावा लागतो. कार्यकर्त्यांकडे केवळ वक्तृत्व अथवा बुद्धी असून चालत नाही, तर चांगल्या विचाराला प्रचाराची जशी गरज असते, त्याचप्रमाणे बहुश्रुतपणाची गरज असल्याचे प्रतिपादन बौद्ध उपासक आनंद धामापूरकर यांनी गुरूवारी केले.भारतीय बौद्ध सभेच्यावतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिरमध्ये कै. भैयासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर समाज मंदिरमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष बुधाजी कांबळी होते. यावेळी जिल्हाध्यक्ष सत्यवान जाधव, गोवा विभागाचे भीमराव चव्हाण, अर्जुन कोरगावकर, आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बुद्ध वंदना झाल्यानंतर आर. जी. चौकेकर यांनी स्वागत करून प्रास्ताविकातून कार्यकर्त्यांना प्रशिक्षणाची गरज का आहे, हे स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सत्यवान जाधव, गोव्याचे भीमराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. बुधाजी कांबळी यांनी आभार मानले. (वार्ताहर)
आचरणातून ओळख पटवून द्या
उपासक धामापूरकर यांनी बौद्ध महासभेची स्थापना, कामकाजाची पद्धत, कार्यकारिणी, इत्यादी माहिती सांगून कार्यकर्ता कसा असावा, हे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांची जबाबदारी, भूमिका, संपर्क इत्यादीबाबत सविस्तर माहिती दिली. सध्याच्या जागतिकीकरणात, खासगीकरणात सुखशांतीसाठी धम्म महत्त्वाचा असल्याने प्रत्येकाने स्वत:च्या आचरणातून आपली ओळख इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.