संस्कृती संवर्धनासाठी लोकविद्यापीठाची गरज : प्रभाकर मांडे -अखिल भारतीय लोककला संमेलनाचे शानदार उद्घाटन-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:07 AM2018-05-12T00:07:29+5:302018-05-12T00:07:29+5:30
कऱ्हाड : ‘कोणत्याही गोष्टीच्या प्रचारासाठी लोककलेसारखे दुसरे कोणतेही प्रभावी माध्यम नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे.
कऱ्हाड : ‘कोणत्याही गोष्टीच्या प्रचारासाठी लोककलेसारखे दुसरे कोणतेही प्रभावी माध्यम नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. नाट्य स्पर्धांप्रमाणे लोककलेच्या स्पर्धा जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर झाल्या पाहिजेत. शिवाय लोकसंस्कृतीकडे आमचे अक्षम्य दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे संस्कृती टिकविण्यासाठी लोकविद्यापीठ सुरू करण्याची गरज आहे,’ असे मत लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांनी व्यक्त केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात शाहीर पठ्ठे बापूराव शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय लोककला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षपदावरून डॉ. मांडे बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कºहाड जिमखान्याचे अध्यक्ष महिंद्र शहा, सचिव सुधीर एकांडे, लोकरंगच्या शैला खांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. मांडे म्हणाले, ‘सामाजिक जीवन सुरू झाल्यापासून संशोधन हे सुरूच आहे. त्यामुळे नाविन्याचा शोध हा लागत गेला. अग्नी, चाकाचा शोध लागला. असे विविध शोध लागत गेले; पण हे शोध लागले असले तरी चित्र, गाणं ही आमची जगण्याची जुनी पद्धत होती.
आता मात्र, ती बदलू पाहत आहे. आमची श्रृजणशीलताच गेली आहे. आम्ही एकाकी होत चाललो आहे. एखाद्या वेळेला आम्ही दु:ख एकटेच प्रकट करू शकतो; पण आनंद एकट्याला व्यक्त करता येत नाही. हे एकटेपण माणसाला भयावह करते. याचे भान आम्ही ठेवायला पाहिजे.
खरंतर आज कलेल्या बाबतीत बोलायचे झाले तर जीवनाच्या भान असणाऱ्या कला आज लोप पावत चालल्या आहेत. तर प्रेक्षाभान असणाºया कला फक्त जिवंत दिसतात. ही बाब विचार करायला लावणारी आहे.’ राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर म्हणाले, ‘लोककला हा तर भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. त्यामुळे तो जोपासण्यासाठी राज्यात लोककला प्रशिक्षण देणाºया अॅकॅडमी सुरू होण्याची गरज आहे. कार्यक्रमास शहर व परिसरातील कलापे्रमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...तर लोककला धोक्यात येईल
एखादी कला दुसऱ्याला शिकवायची म्हटलं तर प्रशिक्षण कोण देणार? प्रशिक्षण द्यायचचं म्हटलं की त्याच मग शास्त्र होतं. आणि कोणतीही कला शास्त्रात बसली की त्याच मुक्तपण हरवून जातं. त्यामुळे लोककलेचं शास्त्र बनवल गेलं, त्याच प्रदर्शन केलं गेलं की लोककला धोक्यात येईल, असे मत मांडे यांनी व्यक्त केले.
नवं स्वीकारा; पण मूळ सोडू नका !
आमच्या संस्कृतीत आम्ही नव्याचा स्वीकार करतो. पहिल्याचं स्वत्व कायम ठेवून नवं स्वीकारल पाहिजे. कलाकारांनी तर परंपरेनी आलेली कला आणि त्याबरोबर नव्या कलेचा स्वीकार जरूर करावा; पण आपलं मूळ सोडू नये, असे आवाहन डॉ. मांडे यांनी यावेळी केले.
पठ्ठे बापूरावांनी कला आणि जातीचं नातं तोडल!
पठ्ठे बापूरावांनी कला अन् जात यांच नातं तोडलं. खऱ्या अर्थाने त्यांनी कलेला मुक्त केलं आणि शेवटपर्यंत त्यांनी कला जोपासली. रामजोशींसारखा डफ त्यांनी फोडला नाही. म्हणून त्यांच्या बंडखोरीच समर्थन आज या संमेलनाच्या निमित्ताने केलं जातयं, ही बाब कौतुकास्पद असल्याचे मत मांडे यांनी मांडले.
यांचा झाला सन्मान...
लोककलेबद्दल गेली पन्नास वर्षे अविरत काम करणारे डॉ. प्रकाश खांडगे, प्रा. डॉ. प्रभाकर मांडे, चंद्रकांत हिंगमिरे (कऱ्हाड), ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद कुलकर्णी, पठ्ठे बापूरावांचे दत्तकपुत्र बापूराव कुलकर्णी, अरुण गोडबोले, रघुवीर खेडकर आणि राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या मंगला बनसोडे यांचा या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
कऱ्हाड येथे अखिल भारतीय लोककला संमेलनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना डॉ. प्रभाकर मांडे व राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, यावेळी कºहाड जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्र शहा, सचिव सुधीर एकांडे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शैला खांडगे यांची उपस्थिती होती. दुसºया छायाचित्रात सुखदा खांडगे आणि प्रमिला लोदगेकर यांची कथ्थक व लावणीची जुगलबंदी कºहाडकरांना पाहायला मिळाली.