कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर थांब्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:31 AM2021-01-04T04:31:17+5:302021-01-04T04:31:17+5:30
कऱ्हाड : येथील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसरात बस थांबा गरजेचा आहे. या परिसरात सद्यस्थितीत कोल्हापूर बाजूकडून येणाऱ्या ...
कऱ्हाड : येथील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका परिसरात बस थांबा गरजेचा आहे. या परिसरात सद्यस्थितीत कोल्हापूर बाजूकडून येणाऱ्या एसटी तसेच अन्य वाहने सेवा रस्ता तसेच महामार्गाकडेला थांबतात. त्याचबरोबर पुणे तसेच मुंबईकडे जाणारे प्रवासीही वाहनांची वाट पाहत महामार्गालगत उभे असतात. या परिसरात वाहनांचा वेग प्रचंड असतो. त्यामुळेच अपघाताचा धोका नेहमी असतो. काही दिवसांपूर्वी या परिसरात दोघांचा बळी गेला आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरात बस थांबा करण्याची मागणी जोर धरत आहे. आगार व्यवस्थापनाने याबाबत कार्यवाही करणे गरजेचे आहे.
पाटणमध्ये आज रक्तदान शिबिराचे आयोजन
पाटण : आधार जनसेवा सामाजिक संस्था, पाटणचे ग्रामीण रुग्णालय व कऱ्हाडातील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. ४ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाटण येथील विविध संस्थांचे आश्रयदाते दिनकरराव जगताप यांच्या स्मरणार्थ ग्रामीण रुग्णालयात सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या वेळेत हे शिबिर होणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. के. यादव यांच्या उपस्थितीत त्याचा प्रारंभ होणार असून श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष विलासराव क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कऱ्हाडला भेदा चौकात नियमांची पायमल्ली
कऱ्हाड : येथील भेदा चौकात वाहन चालकांकडून वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली सुरू आहे. तहसील कार्यालयाकडून कोल्हापूर नाका परिसराकडे जाणारे वाहनचालक चुकीच्या पद्धतीने वळण घेत असतात. त्यामुळे पोपटभाई पेट्रोल पंपाकडून येणारे वाहनचालक तसेच कार्वेनाका बाजूकडून येणारे वाहनचालक गोंधळात पडतात. वाहतूक पोलिसांसमोरही अनेकदा वाहतूक नियमांची पायमल्ली होते. या परिस्थितीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक पोलिसांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
वातावरणात बदल; साथरोगाबाबत जनजागृती
कऱ्हाड : सध्या वातावरणात बदल होत असल्याने साथरोग पसरत आहेत. या रोगांपासून बचाव करून आरोग्य जपण्याचा तसेच पाणी उकळून पिणे, नियमित औषधे घेण्याच्या सूचना डॉक्टरांकडून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना दिल्या जात आहेत. दिवसा उकाडा व रात्रीच्यावेळी कडाक्याची थंडी पडत असल्याने सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने सध्या रुग्णालयेही फुल्ल असल्याचे चित्र दिसत आहे.
ढेबेवाडी मार्गावर पिकअप् शेड उभारण्याची मागणी
कुसूर : ढेबेवाडी ते कऱ्हाड या मार्गावर अनेक गावांच्या प्रवेशद्वारांवर अद्यापही एसटी महामंडळाच्यावतीने प्रवासी थांबण्यासाठी निवारा शेड बांधण्यात आलेले नाहीत. त्यामुळे प्रवाशांना उन्हात थांबून एसटीची वाट पाहावी लागत आहे. रस्ता चौपदरीकरणात ठिकठिकाणी असणारी शेड जमीनदोस्त करण्यात आली. त्यावेळी संबंधित ठेकेदाराने नव्याने शेड उभारण्याचे आश्वासन गावोगावच्या ग्रामस्थांना दिले होते. मात्र, रस्ता चौपदरीचे काम पूर्ण होऊन दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी, अद्याप त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. एसटी आगारही त्याबाबत म्हणावे तेवढे गंभीर नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे.