Satara: वडिलांची साद, त्याला नीलमचा प्रतिसाद; अपघातग्रस्त लेकीसाठी वडील पोहोचले अमेरिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 13:19 IST2025-03-04T13:19:04+5:302025-03-04T13:19:46+5:30
सातारा : अमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथे अपघातानंतर अठरा दिवस कोमात असणाऱ्या नीलम शिंदे हिने सोमवारी वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला. अतिदक्षता ...

Satara: वडिलांची साद, त्याला नीलमचा प्रतिसाद; अपघातग्रस्त लेकीसाठी वडील पोहोचले अमेरिकेत
सातारा : अमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथे अपघातानंतर अठरा दिवस कोमात असणाऱ्या नीलम शिंदे हिने सोमवारी वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला. अतिदक्षता विभागात अत्यवस्थ असलेल्या लेकीला हाक मारल्यानंतर डोळ्यांची किंचित हालचाल झाल्याने वडिलांच्या येण्याने नीलम उपचारांना प्रतिसाद देईल, असा विश्वास तेथील वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत असणारी अपघातग्रस्त नीलम शिंदे अत्यवस्थ अवस्थेत अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. तिच्या रक्तातील नातेवाइकांना व्हिसा मिळविण्यात येणाऱ्या अडचणींचे विघ्न सुटून तिचे वडील तानाजी शिंदे आणि मामाचा मुलगा गाैरव कदम चोवीस तासांच्या प्रवासानंतर यूसी डेव्हिस मेडिकल सेंटर सॅकरामेन्टो येथे पोहोचले. रात्री उशिरा पोहोचल्यामुळे नीलमवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय टीमबरोबर वडिलांचा संवाद झाला नाही. मात्र, तिची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वडिलांची हाक ऐकल्यावर डोळे बंद असतानाही तिच्या बुबुळांची हालचाल टिपली.
कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज गावातील नीलमचा १४ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेत अपघात झाला. व्यायामासाठी चालत असताना एका चारचाकी गाडीने पाठीमागून तिला जोरदार धडक दिली. या अपघाताला दोषी असलेल्या कारचालकाला पोलिसांनी पकडले आहे. या अपघातात नीलमच्या डोक्याला आणि दोन्ही हातापायांना दुखापत झाली आहे. तिच्या छातीलाही मार लागला असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे.
तिचे वडील व मामाचा मुलगा सॅकरामेन्टोला निघाल्यानंतर सोमवारी मध्यरात्री ते पोहोचले. भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री साडेअकरानंतर नीलमवर उपचार करणारे डाॅक्टर तिच्या कुटुंबीयांशी बोलून उपचारांची पुढील दिशा ठरविणार आहेत.
भारतीयांची मदत अन् डाॅक्टरांची प्रतीक्षा
उंब्रज येथील नीलम शिंदे हिला भेटण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना मदत करण्यासाठी अमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथील भारतीयांनी आघाडी घेतली. विमानतळावरून हाॅस्पिटलमध्ये नेण्यासाठी भारतीय पोहोचले होते. दहा दिवस त्यांच्या राहण्याची व्यवस्था सॅन जोसे स्टेट युनिव्हर्सिटीने केली आहे. तिने या दोघांना काेणतीही अडचण येणार नाही याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.