माउलींच्या पादुकांचे नीरा स्नान, पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:22 PM2019-07-02T16:22:06+5:302019-07-02T16:24:24+5:30
वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने नीरेकडे प्रस्थान केले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माउलींच्या पादुकांना नीरा दलघाटावर स्नान घालण्यात आले.
सातारा : वाल्हे मुक्कामानंतर सकाळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने नीरेकडे प्रस्थान केले. दुपारच्या न्याहारीनंतर सोहळ्याने सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी माउलींच्या पादुकांना नीरा दलघाटावर स्नान घालण्यात आले.
माउलींच्या पादुकांना नीरा नदीवर स्नान घालण्याची ७०० वर्षांची परंपरा आहे. त्यानुसार दुपारी दीडच्या सुमारास माउलींची पालखी नीरा नदीवरील दत्त घाटावर आल्यानंतर अवघा दत्त घाट परिसर माउलींच्या जयघोषाने दुमदुमला. यावेळी हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती. हा सोहळा सुरू असताना वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले होते. हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदंगांच्या गजरात माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे आज दुपारी मोठ्या आनंदाने भक्तिमय वातावरणात सातारा जिल्ह्यात आगमन झाले.
संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पाडेगाव (ता. खंडाळा) येथे सातारा जिल्ह्यात पालखी सोहळ्याने प्रवेश करताच सातारा जिल्ह्याच्या वतीने खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप वारके, आ. आनंदराव पाटील, जिजामाला नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, माजी आमदार मदन भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, कृषी सभापती मनोज पवार, जिल्हा परिषदेच्या सदस्या दीपाली साळुंखे, उदय कबुले, खंडाळा पंचायत समितीचे सभापती मकरंद मोटे, उपसभापती वंदनाताई धायगुडे, सदस्य राजेंद्र तांबे, अश्विनी पवार, चंद्रकांत यादव, शोभा जाधव, प्रांत संगीता चौगुले, तहसीलदार दशरथ काळे, नरेंद्र पाटील, पोडगावच्या सरपंच हरिश्चंद्र माने, उपसरपंच विजय धायगुडे, सरपंच स्मिता स्वरात यांनी माउलींच्या पालखीचे स्वागत केले.
नीरा नदीतील स्नानाने ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. पाडेगाव येथे लाखो भाविकांनी माउलींचे दर्शन घेतले. फडफडणाऱ्या भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा गजर आणि हरिनामात, हरिभजनात तल्लीन होऊन वारकरी नाचत होते. भाविकांच्या प्रचंड उत्साहाने माउलींचा पालखी सोहळा भक्तरसात चिंब होऊन गेला होता. विठ्ठल नामाचा जयघोष करीत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी सातारा जिल्ह्यात भव्य स्वागत करण्यात आले. नीरा नदीपात्रात माउलींच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर दुपारी चार वाजता पालखी सोहळा लोणंदनगरीत विसावला.