नीरा-देवघरचे पाणी मोर्वेत दाखल
By admin | Published: February 26, 2017 12:32 AM2017-02-26T00:32:29+5:302017-02-26T00:32:29+5:30
आनंदोत्सव साजरा : खंडाळा तालुक्यातील ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्तांकडून पूजन
शिरवळ : चातकाप्रमाणे वाट पाहत बसलेल्या खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कारण नीरा-देवघर प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आश्वासनाप्रमाणे मोर्वे गावापर्यंत पाणी पोहोचले आहे. हे पाणी पोहोचल्यानंतर मोर्वे ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जलपूजन करण्यात आले व आंनदोत्सवही साजरा केला.
मोर्वे, ता. खंडाळा याठिकाणी मोर्वे व ११ गावांमधील ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने सरपंच मीनाक्षी धायगुडे, नंदकुमार धायगुडे, ग्रामस्थ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी नीरा-देवघरचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट, खंडाळा पाणी पंचायतीचे अध्यक्ष अॅड. बाळासाहेब बागवान, माजी सभापती प्रा. एस. वाय. पवार, खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विजय शिंदे, काँग्रेसचे अजय धायगुडे, मानसिंग धायगुडे, पंडित जगताप, मल्हारी जगताप, धनाजी डेरे, भुजंग पवार, गोरख धायगुडे, आबासाहेब शेटे, शामराव धायगुडे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामस्थ व प्रकल्पग्रस्तांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नीरा-देवघरच्या कालव्याचे काम कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करत मार्चअखेर वाघोशीपर्यंत पाणी प्रवाहित करण्यात येईल, असे आश्वासन नीरा-देवघरचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोळभट यांनी दिले.
याप्रसंगी अॅड. बाळासाहेब बागवान, डॉ. विजय शिंदे, प्रा. एस. वाय. पवार, नंदकुमार धायगुडे, मानसिंग धायगुडे, पंडित जगताप आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. विजय शिंदे, नीरा-देवघर प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांकडून करण्यात आला.शामराव धायगुडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
आंदोलनाचा इशारा
नीरा-देवघर कालव्याचे काम पूर्ण करुन पाणी वाघोशीपर्यंत सोडण्यासाठी ११ गावांच्या ग्रामस्थांनी निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. तसेच प्रकल्पाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर प्रशासनाने कालव्याचे काम पूर्ण करीत मोर्वेपर्यंत पाणी आणले आहे.