नीरा-देवघरच्या पाण्यामुळे ओढे खळाळले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 11:43 PM2017-08-28T23:43:07+5:302017-08-28T23:43:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : नीरा-देवघर धरणाचे पाणी या प्रकल्पाच्या सिंचन क्षेत्रामध्ये असणाºया खंडाळा तालुक्यातील गावांना पोहोचल्याने खरीप
हंगाम वाचला आहे. नीरा-देवघरच्या पाण्याने शिवार पुन्हा
एकदा फुलल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ओढ्यांना पाणी वाहू लागले आहे.
या वर्षी पावसाने चांगलीच हुलकावणी दिली असल्याने वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे आदी गावांमध्ये व परिसरांत पिण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता, या भागातील बाजरीचे पीक देखील पाण्याअभावी वाळू लागले होते. त्यामुळे मोर्वे
येथील कालव्यावरील पुलाचे अर्धवट काम पूर्ण करून नीरा-देवघर धरणातील पाणी उजव्या कालव्यातून खंडाळा तालुक्यापर्यंत सोडण्यात आले असून, हे पाणी अंदोरी गावापर्यंत पोहोचले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हे पाणी तब्बल १७
वर्षांनी अंदोरीच्या शिवारात खळाळत आहे.
खंडाळा तालुक्यापर्यंत नीरा-देवघरचे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी खंडाळा विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली होती,
या मागणीनुसार नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शिवाजी बोलभट यांनी १५ आॅगस्टपासून पाणी सोडण्याचे नियोजन केले होते.
त्यातच नीरा-देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने धरणात मोठा पाणी साठा झाला आहे. त्याबरोबर नीरा-देवघर, भाटघर या धरणामधून मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात सोडण्यात आल्याने धरण भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे, खंडाळा तालुक्यातही पाऊस नसल्याने नीरा-देवघरच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागल्याने नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी
सोडण्यात आले असल्याने आता खंडाळा तालुक्यातील वाघोशी, अंदोरी, कराडवाडी, मोर्वे, लोणी, तोंडल, शिवाजीनगर, भादवडे, शेखमिरवाडी, शिरवळ आदी गावांतील शेतकºयांना दुष्काळात दिलासा मिळणार आहे. पाण्याअभावी जळू लागलेल्या पिकांनादेखील जीवनदान मिळणार आहे. अंदोरी मध्ये पाणी दाखल झाल्यावर नीरामाईचे हे पाणी पाहण्यासाठी अंदोरीकरांनी मोठी गर्दी केली होती. पाणी सोडल्याने समाधान व्यक्त होत आहे.