गुन्हेगारी कारवायामुळे साताऱ्यातील नीरा नदीपात्र बदनाम; आत्महत्या, खूनाच्या घटनेत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 02:21 PM2022-11-17T14:21:28+5:302022-11-17T14:24:39+5:30
परस्परांच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणाची निवड करून गुन्हेगारी कारवाया करण्याचे प्रस्थ वाढल्याने नीरा नदीपात्र अधिक बदनाम झाले.
प्रगती जाधव-पाटील
सातारा : कारागृहात परजिल्ह्यातील गुन्हेगारांच्या परस्परांशी झालेल्या ओळखीचं पर्यवसान पुढे टोळीत होत असल्याने पोलिस यंत्रणासाठी यांना जेरबंद करणे मोठे आव्हान ठरत आहे. परस्परांच्या हद्दीत सुरक्षित ठिकाणाची निवड करून गुन्हेगारी कारवाया करण्याचे प्रस्थ वाढल्याने नीरा नदीपात्र अधिक बदनाम झाले.
सातारा जिल्ह्यात नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद यासह पुण्या-मुंबईच्या टोळ्या सक्रिय असतात. या टोळ्यांच्या मध्ये नव्या चेहऱ्यांचा उपयोग कारवायांसाठी केला जातो. गुन्हा पचविण्यासाठी, पुरावा नष्ट करण्यासाठी नीरा नदीचे पात्र सुरक्षित असल्याची रेकी गेल्या काही वर्षांमध्ये गुन्हेगारांनी केली आहे. परिणामी गेल्या वर्षभरामध्ये वीसहून अधिक घटना शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. वास्तुविशारद यांचा खून, सांगलीतील उद्योजकांच्या मुलाचा घातपात व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या आत्महत्येचा समावेश आहे.
पुण्यापेक्षा सातारा सोयीचा
सातारा जिल्ह्याच्या हद्दीत खून करून निरा नदीपात्रात मृतदेह टाकल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील एका संशयिताने पोलीस तपासात धक्कादायक खुलासा केला होता. त्याने पोलिसांजवळ सांगितलं की, ‘पुण्यात गुन्हा दाखल झाला तर कोणाकडे जायचं आणि कुठं कोणाला मॅनेज करायचं, हा मोठा प्रश्न असतो. तिथं होणाऱ्या ‘तडजोडी’ हलक्यात नसतात. पुण्यापेक्षा सातारा कधीही ‘परवडतो’! आता हे परवडणं काय आणि कसं यावर मात्र तो संशयितच अधिक प्रकाश टाकू शकतो.
कारागृहात मिळतेय यंत्रणांना गुंगारा देण्याची शिकवण
कारागृहात आठवड्यापेक्षा अधिक वेळ राहिलेल्यांना येथे गुन्हेगार विश्वातील गुरू आणि महागुरू भेटतात.आपापल्या आवडीने कारागृहात टोळीत सहभागी व्हायचं आणि बाहेर पडल्यानंतर काही काम असेल तरच भेटायचं हा निकष अगदी ठरलेला असतो. कारागृहात असताना मात्र, गुन्हा कसा करावा? पुरावा कसा नष्ट करावा? यासह यंत्रणेला गुंगारा देण्याचे एकसेएक किस्से चवीने सांगितले जातात