बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:04+5:302021-02-11T04:41:04+5:30

.............. नियमांचे उल्लंघन सातारा : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मात्र ...

Neglect of construction department | बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Next

..............

नियमांचे उल्लंघन

सातारा : शहरातील वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मात्र अतिउत्साही वाहनचालक सिग्नल मिळण्‍यापूर्वीच भरधाव वेगाने गाड्या पळवत आहेत. त्यामुळे अनेकवेळा अपघाताचे प्रकार घडत आहेत. संबंधित नियम तोडणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.

.................

रस्ता दुरुस्तीची मागणी

सातारा : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील पुसेगावसह नेर, धावडदरे, कटगुण, काटकरवाडी या गावांमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. अनेकदा या रस्त्यांवर लहान-मोठे अपघातही झाले आहेत. लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

............................

पिकांचे नुकसान

सातारा : वन्यजीवांचा मानवी वस्तीसह शिवारातील पिकांमध्ये वावर वाढला असून, रब्बीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, मका, गहू, हरभरा ही पिके जोमात आली आहेत. सध्या गहू, बाजरीची कणसे भरू लागली असून, रानडुकरे, गव्यांच्या झुंडी उभ्या पिकांमध्ये धुडगूस घालत आहेत.

..............................

रस्त्यावर अतिक्रमण

सातारा : शहरातील राजवाडा चौपाटीवरील बेशिस्तपणा, यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. कोरोनापूर्व काळातील राजवाडा चौपाटी खाऊगल्ली म्हणून वापरली जात होती. कोरोनामुळे चौपाटी बंद आहे. काही महिन्यांपासून चौपाटीचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जात आहे.

.......

खड्ड्यांमुळे धोका

सातारा : सातारा-कोरेगाव रस्त्यावर कृष्णानगर येथील वीज वितरण कंपनीसमोरील रस्त्याच्या दुतर्फा वर्षांपूर्वी गळती काढण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्डयामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अनेकजण या खड्डयात पडून जायबंदी झाले आहेत.

.......

रस्ता अरुंद

सातारा : सातारा तालुक्यातील गोळेगाव व वेचले गावच्या सीमाभागाच्या हद्दीतील पुलाचे काम दोन वर्षांपर्यंत बंद असल्याने पावसाळ्यात तसेच सद्यस्थितीत ऊस वाहतुकीसाठी अरुंद रस्त्यावरूनच वाहतूक करावी लागत आहे. या पुलाच्या कामासाठी जिल्हा परिषदेने लक्ष घालून या पुलाचे अर्ध्यावर बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

...........................

पहाटेच्या वेळी गर्दी

सातारा : सातारा शहर व परिसरामध्ये पहाटेच्या वेळी मॉर्निंग वाॅकसाठी गर्दी होऊ लागली आहे. वातावरणातील बदलामुळे मागील काही दिवसांपासून थंडी गायब झाली होती. मात्र गेल्या पाच-सहा दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. दिवसभर कडक ऊन पडतच नाही. दुपारी उकाडा जाणवत असला तरी रात्री व पहाटेच्या वेळी तापमानाचा पारा चांगलाच घसरत आहे.

.....

बेशिस्त पार्किंग

सातारा : येथील बसस्थानक परिसरात रस्त्याकडेला अस्ताव्यस्तपणे लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत आहे. या वाहनांमुळे ये-जा करणारी वाहने दिसत नसल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. येथील पोलीस प्रशासनाने तातडीने वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे.

...........................

गरजूंना रेशन कार्ड

सातारा : सातारा तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेकडून गरीब झोपडपट्टीवासीयांना रेशन कार्ड वाटप करण्यात आले. तहसीलदार आशा होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा निरीक्षक संतोष दळवी यांनी संबंधित कार्डधारकांना मदत केली.

...

वातावरणात बदल

सातारा : हवेची चक्रिय स्थिती निर्माण झाल्याने खटाव तालुक्यातील वातावरण चांगलेच बदलले आहे. सायंकाळनंतर पहाटेपर्यंत कडाक्याची थंडी, तर दिवसा उन्हाचा तडाखा बसत असल्याने लोक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. विविध रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाच्या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे.

......

दुकानासमोर वाहने

सातारा : खटाव तालुक्याची मुख्य बाजारपेठ असणारे वडूज शहर. त्यामुळे येथे विविध लहान-मोठ्या व्यवसायासह दुकानांची मोठी रेलचेल. मात्र येथील व्यावसायिकांना दुचाकी, चारचाकी वाहनांच्या पार्किंगच्या समस्येने चांगलेच ग्रासले आहे. दुकानासमोर ग्राहकांऐवजी वाहनांचीच अधिक गर्दी दिसून येत आहे.

............................

समस्यांच्या विळख्यात

पुसेगाव : येथील विविध भागांतील वसाहती समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या आहेत. गावातील प्रभाग क्रमांक १ मधील जमदार वाडा हवेली परिसरात गटारांची सोय नसल्याने नागरी वस्तीत सांडपाणी साचत आहे. त्यामुळे घरात, घराच्या आजुबाजूला लहान डबकी तयार होऊन दुर्गंधी पसरत आहे. आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

.......

वेळापत्रक बदला

मायणी : पाचवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू झाले. मात्र विना सुटी सलग अध्यापनाच्या तासिका होत आहेत. त्यामुळे पॉकेटमनी खर्च करून खाऊ खाण्यास व मैदानावर खेळण्यास मिळत नसल्याने विद्यार्थी अस्वस्थ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळेत वेळापत्रकात छोट्या व मोठ्या सुटीचे प्रयोजन करण्याची मागणी विद्यार्थी व पालक करीत आहेत.

.....

हुरडा पार्टी

सातारा : गोवऱ्यांची शेकोटी, त्यातील निखाऱ्यावर खरपूस भाजलेली ज्वारीची कोवळी दाणेदार कणसे आणि मग हातावर किंवा दगडावर कणीस घासल्यानंतर तयार होणारा गरमागरम हुरडा, गूळ-लसणाच्या चटणीसोबत चाखत रंगलेल्या छान गप्पा... असे चित्र सातारा तालुक्यातील शेतशिवारात दिसू लागले आहे.

Web Title: Neglect of construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.