सामाजिक वनीकरणाच्या दुर्लक्षाने रोपे होरपळली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:57 AM2021-02-23T04:57:04+5:302021-02-23T04:57:04+5:30
रहिमतपूर : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवडीचा नारा दिला जात आहे. मात्र, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने कण्हेरखेड-अपशिंगे- साप ...
रहिमतपूर : पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्ष लागवडीचा नारा दिला जात आहे. मात्र, सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने कण्हेरखेड-अपशिंगे- साप आदी रस्त्याच्या बाजूच्या व परिसरातील गायरान क्षेत्रातील शेकडो रोपे पाण्यावाचून करपू लागली आहेत. संरक्षक जाळ्या व बांबूही गायब झाले आहेत.
सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड-अपशिंगे-साप या रस्त्यादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा लिंब, आवळा, चिंच, करंज, गुलमोहर, आपटा आदी विविध प्रकारची रोपे लावण्यात आली आहेत. याबरोबरच अंभेरी, अपशिंगे व सासुर्वे येथील गायरानातही झाडे लावलीत. परंतु, पाण्याअभावी रस्त्याकडेची व गायरानातील बहुतांशी रोपे करपू लागली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झाडांना लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्या व बांबूही गायब झाले आहेत, तर कंत्राटी कर्मचारीही चार महिन्यांपासून पगारापासून वंचित आहेत.
या रोपांना पाणी देण्यासाठी टँकरची व्यवस्था करणे, पाणी देणे व देखरेखीसाठी मजुरांची रोजंदारीवर नेमणूक करणे आदी कामे सामाजिक वनीकरण विभाग करतो. मात्र, बहुतांश ठिकाणी विभागाने लागवड केलेली झाडे सद्यस्थितीत त्या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत. एक तर रोपे पाण्यावाचून जळतात. नाही तर सुरक्षिततेअभावी जनावरांच्या पायाखाली तुडवून नाहीशी होताच. परंतु, सामाजिक वनीकरणचे अधिकारी कागदोपत्री रोपे दाखवण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. सध्या अनेक रोपे पाण्यावाचून करपू लागली आहेत. अनेक झाडांची पाने गळून गेली आहेत.
चौकट :
जुन्या खड्ड्यात नवीन रोपे...
दरवर्षी गाजावाजा करून वृक्ष लागवड फोटोसेशन करून करण्यात येते. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट कागदोपत्री पूर्ण होते. मात्र, त्याची सुरक्षा केली जात नसल्यामुळे दरवर्षी पुन्हा जुन्या खड्डयातच नवीन रोपे लावण्याचा उद्योग केला जात आहे. परंतु, कामाची बिले काढताना मात्र खड्डा काढणी, लागवड करणे, पाणी देणे आदी खर्चासह काढली जातात. मग ती कुणाच्या खिशात जातात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकट :
किती रोपे जगली?
वृक्ष लागवड मोहीम कालावधीत रहिमतपूर परिसरात किती ठिकाणी किती रोपांची लागवड केली, त्यावर किती खर्च झाला, लावलेल्या झाडांपैकी किती जगली, याचे संशोधन होणे गरजेचे आहे. अन्यथा पाण्याच्या खेपांवर आणि खड्डयांच्या संख्येवर पोट भरणाऱ्यांचे फावल्याशिवाय राहणार नाही. वरिष्ठांनी बेजबाबदार काम करणाऱ्यांच्या कामाचे ऑडिट करावे, अशी मागणी परिसरातून होत आहे.
फोटो दि.२१रहिमतपूर झाडे फोटो...
फोटो ओळ :
कण्हेरखेड-साप या रस्त्याकडेची रोपे पाण्यावाचून करपू लागली आहेत. (छाया : जयदीप जाधव)
\\\\\\\\\\\\\\\\\\\\